आबांच्या खेळीने काँग्रेसला लॉटरी
By admin | Published: July 16, 2014 11:25 PM2014-07-16T23:25:58+5:302014-07-16T23:38:26+5:30
तासगाव नगरपालिका : संजयकाकांच्या गटाला धक्का
अमित काळे - तासगाव
तापलेल्या तासगावच्या आखाड्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली. यात काँग्रेसचे उमेदवार संजय पवार यांना नगराध्यक्षपदाची लॉटरी लागली, तर आवश्यक संख्याबळ होईल, असा विश्वास असणाऱ्या खा. संजयकाका पाटील गटाला पराभवाला सामोरे जावे लागले.
आठवडाभरापासून तासगावचे राजकारण नगरपरिषदेच्या सत्ताकारणावरून सुरू होते. तुल्यबळ असणारे आबा—काका गट आमने—सामने असल्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर नगराध्यक्ष निवडीवरून तयार झालेला ‘सस्पेन्स’ तासगावकरांना अनुभवायला मिळाला. १९ सदस्यसंख्या असलेल्या पालिकेत १0 मतांसह काँग्रेसच्या संजय पवार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
दोन्ही गटाकडून नगराध्यक्ष पदावर दावा करण्यात आला. पालिकेत आबा गटापेक्षा काका गटाचे संख्याबळ कमी असून देखील काका गटाचा विश्वास ठाम होता. त्यांनी आबा गटाचे नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न केले होते. मूळ बलाबल पाहिले, तर आबा गटाकडे १0, काका गटाकडे ८ व काँग्रेसचा १, असे १९ सदस्य निवडून आले होते.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काँग्रेसचे नगरसेवक संजय पवार यांचा अर्ज भरायला लावून शेवटी त्यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गटाच्या शुभांगी साळुंखे यांचा अर्ज मागे घेण्यात आला. गृहमंत्री पाटील गटाच्या नगरसेविका जयश्री धाबुगडे यांनी काका गटाच्या बाबासाहेब पाटील यांना मतदान केले. आणखी एखादा नगरसेवक फुटला असता, तर काका गटाचा नगराध्यक्ष झाला असता. यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले होते. परंतु आबा गटाची रणनीती यशस्वी झाली.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासूनच दोन्ही गटाचे नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ होते. आज सकाळपासून हालचाली पुन्हा गतिमान झाल्या होत्या.या निवडणुकीत व्हीपही काढण्यात आला. आबा गटाच्या अमोल शिंदे यांनी सोमवारी, तर काका गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी व्हीप काढला. हे दोन्ही व्हीप पालिकेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आले होते. दोन्ही गटाकडून व्हीप निघाल्याने चांगलाच संभ्रम तयार झाला.
पालिकेच्या निवडणुकीवेळी आबा-काकांचे सख्य होते. दोन नेत्यांमधील बिघाडीनंतरच ही निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचे कारण आगामी विधानसभा निवडणुकीतही आहे. एकूणच रंगलेल्या या राजकारणात गृहमंत्र्यांनी शह-काटशहच्या राजकारणातून काँग्रेसच्या नगरसेवकाला नगराध्यक्ष केले व खा. संजयकाका पाटील गटाला सत्तेपासून दूर ठेवले.
आज नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत पूर्वाश्रमीच्या मंत्री पाटील गटाच्या नगरसेविका जयश्री धाबुगडे यांनी खासदार संजय पाटील गटाच्या बाबासाहेब पाटील यांना मतदान केले. आणखी एखादा नगरसेवक फुटला असता, तर खासदार गटाचा नगराध्यक्ष झाला असता. यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले होते. मात्र गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काँग्रेसचे नगरसेवक संजय पवार यांचा अर्ज भरायला लावून शेवटी त्यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गटाच्या शुभांगी साळुंखे यांचा अर्ज मागे घेण्यात आला. परंतु आबा गटाची रणनीती यशस्वी झाली.