काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचा सूर : सांगलीत पहिली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:14 PM2018-06-22T23:14:09+5:302018-06-22T23:16:45+5:30
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पहिल्या बैठकीला अखेर शुक्रवारी मुहूर्त मिळाला. वसंत बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत आघाडीबाबत बैठक झाली. यावेळी
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पहिल्या बैठकीला अखेर शुक्रवारी मुहूर्त मिळाला. वसंत बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत आघाडीबाबत बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने निम्म्या म्हणजे ३९ जागांची मागणी केली. पण काँग्रेसने निम्म्या जागा देण्याबाबत राष्ट्रवादीला नकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. सध्या दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून आता वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू होणार आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. पण प्रत्यक्षात आघाडीबाबत दोन्ही पक्षांची एकत्रित बैठक झालेली नव्हती. यापूर्वी जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीतच प्रामुख्याने लढती होत. पण लोकसभा ते जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत जिल्ह्यात भाजप एक नंबरचा पक्ष बनला आहे. भाजपचा विजयी रथ महापालिका निवडणुकीत रोखण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी हात पुढे केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगली-मिरजेतील पक्षीय बैठकांतून आघाडीचे संकेत दिले होते. माळ बंगला येथे सत्तर एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील एकत्र आले होते. त्यावेळी आ. जयंत पाटील व खा. चव्हाण यांनी आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. गुरूवारी सांगलीवाडीतील कार्यक्रमात देखील जयंत पाटील यांनी आघाडीबाबत जयश्रीताई पाटील यांच्याशी चर्चा केली.
त्यानंतर शुक्रवारी काँग्रेस-राष्ट्रवादीची प्राथमिक बैठक कॉंग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या विजय बंगल्यावर पार पडल्याचे वृत्त आहे. या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, गटनेते किशोर जामदार, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील उपस्थित होते. आघाडीच्या चर्चेवेळी राष्ट्रवादीने काँग्रेससमोर ३९-३९ जागांचा प्रस्ताव ठेवला. निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी निम्म्या जागांचा प्रस्ताव काँग्रेसला देण्यात आला. पण महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद मोठी आहे. त्यात आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निम्म्या जागांच्या प्रस्तावाला नकार देण्यात आला. काँग्रेसने ४३-३३ जागांचा फॉर्म्युला राष्ट्रवादीला दिला आहे.
आघाडीबाबत पहिलीच बैठक असल्याने दोन्ही बाजूंनी फार ताणाताणी करण्यात आली नाही. जागा वाटप व आघाडीचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत. काही जागांवर पेच निर्माण होणार असल्याने यावर देखील चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात प्राथमिक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरच आघाडीबाबतच्या बैठका व जागावाटपाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे एका पदाधिकाºयाने सांगितले.
दहा जागांवर पेच
आघाडीच्या पहिल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यात दोन्ही पक्षांकडे दहा जागांवर मातब्बर उमेदवार असल्याने या जागांचा तिढा कसा सोडावायचा, यावरही प्राथमिक चर्चा करण्यात आली. त्यात सांगलीवाडीतून काँग्रेसकडून दिलीप पाटील, राष्ट्रवादीतून हरिदास पाटील इच्छुक आहे. धनपाल खोत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने कुपवाड प्रभाग एकमध्ये विद्यमान नगरसेवक प्रशांत पाटील यांच्या उमेदवारीचे काय करायचे?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मिरजेतून माजी महापौर इद्रिस नायकवडी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ते राष्ट्रवादीत आल्यास त्यांनाही काही जागा सोडाव्या लागतील. विशेषत: प्रभाग पाचमधील काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांचे पुत्र करण यांच्याविरोधात नायकवडींनी लढाईची तयारी चालविली आहे. अशा आठ ते दहा जागांचा गुंता भविष्यातही वाढणार आहे.
पुढील आठवड्यात आचारसंहिता?
महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची उत्सुकता साºयांनाच लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आचारसंहिेतेबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही प्रभागात बैठका, सभा घेत वातावरण तापविण्यास सुरूवात केली आहे. पक्षपवेशासाठीही इच्छुक मंडळी राजकीय पक्षांकडे पाठपुरावा करताना नेत्यांच्या मागे-पुढे मिरवताना दिसत आहेत. पण आचारसंहिता लांबणीवर जात असल्याने वेगवेगळ्या अफवांनाही ऊत आला आहे. निवडणुका लांबणीवर जाणार असल्याची अफवाही पसरली आहे. त्यात महापालिका प्रशासनाने मात्र आपल्या पातळीवर निवडणुकीची तयारी चालविली आहे. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे सोमवारनंतर केव्हाही आचारसंहिता लागू होईल, असे प्रशासनाचे मत आहे.