काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, तरीही मिरजेत बंडखोरी
By admin | Published: April 28, 2017 12:58 AM2017-04-28T00:58:18+5:302017-04-28T00:58:18+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, तरीही मिरजेत बंडखोरी
सांगली : महापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतींच्या निवडीसाठी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. प्रभाग एक व दोनमध्ये दोन्ही पक्षांनी समित्या वाटून घेतल्या, तर प्रभाग तीनचा फैसला शनिवारी निवडीवेळी होणार आहे. मिरजेतील प्रभाग चारमध्ये मात्र काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. या प्रभागातून राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे काँग्रेसची अधिकृत उमेदवारी धोक्यात आली आहे. शनिवारी या चारही प्रभाग सभापतींच्या निवडी होणार आहेत.
चार प्रभाग समिती सभापतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी शेवटची मुदत होती. सकाळपासूनच इच्छुक नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या मारला होता. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार यांच्या कार्यालयात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक होऊन, उमेदवारांची नावे निश्चित केली जात होती. दुपारी दोन वाजता काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याशी गटनेते किशोर जामदार यांनी चर्चा करून काही नावांवर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी काँग्रेसला प्रभाग १, २ व ४ अशा तीन समित्या, तर राष्ट्रवादीला प्रभाग समिती दोन देण्याचे निश्चित झाले.
त्यानुसार प्रभाग एकसाठी काँग्रेसकडून पांडुरंग भिसे व वंदना कदम यांनी अर्ज दाखल केले. या प्रभागात राष्ट्रवादीने अर्ज दाखल केला नाही. प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादीकडून अंजना कुंडले, तर स्वाभिमानीकडून अश्विनी खंडागळे यांनी अर्ज दाखल केले. कुंडले यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. त्यामुळे खंडागळे यांची सभापती पदाची वाट बिकट झाली आहे. प्रभाग तीनमध्ये अंतिम निर्णय न झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून गुलजार पेंढारी, तर राष्ट्रवादीकडून स्नेहा औंधकर यांचे अर्ज दाखल झाले.
मिरजेतील प्रभाग चारच्या सभापती पदावरून नाट्यमय घडामोडी घडल्या. या प्रभागावर गेली १८ वर्षे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचे वर्चस्व आहे. नायकवडी यांना विश्वासात न घेताच काँग्रेसकडून अश्विनी कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे शिवाजी दुर्वे हेही इच्छुक होते. त्यांनी स्वतंत्ररित्या अर्ज दाखल करीत बंडखोरी केली, तर राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडली असतानाही शुभांगी देवमाने यांनी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. दुर्वे व देवमाने यांच्यापैकी एक रिंंगणात राहणार, हे निश्चित आहे. त्याचा फैसला इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी शेवटच्याक्षणी करतील. त्यामुळे अश्विनी कांबळे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.
येत्या शनिवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती सदस्यांच्या बैठकीत सभापती पदाची निवड होणार आहे. सांगली व कुपवाडमधील प्रभाग समित्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी, मिरजेच्या प्रभाग समितीवर कोणाचे वर्चस्व राहणार, याचा फैसलाही शनिवारी होईल. (प्रतिनिधी)
इद्रिस नायकवडींची चाल
मिरजेतील प्रभाग समिती चारवर महापालिकेच्या स्थापनेपासून माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचे वर्चस्व आहे. नायकवडींचा पाठिंबा असलेला उमेदवारच आजअखेर सभापती झाला आहे. आताही हा प्रभाग काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे. या प्रभागात २१ सदस्य आहेत. त्यापैकी अकरा ते बारा सदस्य नायकवडींना मानणारे आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तरी, समितीवर नायकवडी गटाचेच प्राबल्य राहणार आहे. या निवडीतून वर्षभरानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मिरजेचे चित्रही जवळपास स्पष्ट होईल. काँग्रेसकडे गटनेता किशोर जामदार वगळता सर्वपक्षीय नगरसेवक नायकवडी यांच्या संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र येतील, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.