कॉँग्रेस, राष्ट्रवादीला यंदा बाद करा
By admin | Published: February 19, 2017 11:16 PM2017-02-19T23:16:33+5:302017-02-19T23:16:33+5:30
सुधीर मुनगंटीवार : खरसुंडीत भाजपच्या उमेदवारांची प्रचार सभा
आटपाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी करुन जशा हजार, पाचशेच्या नोटा बाद केल्या, तसेच या निवडणुकीत ‘एक्स्पायरी डेट’ झालेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीला बाद करा व भाजपच्या सर्व उमेदवारांना साथ द्या. आटपाडी तालुक्याच्या सर्व विकास कामांसाठी शासनाची तिजोरी खुली करेन, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.
भाजपच्या जि. प. आणि पं. स.च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खरसुंडी (ता. आटपाडी) येथे रविवारी मुनगंटीवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या तालुक्यातील रस्त्यांसाठी वाट्टेल तेवढा निधी देतो. शेतकऱ्यांना फक्त पाणी देण्याची गरज आहे. आम्ही ७ हजार २७२ कोटी एवढा निधी गेल्यावर्षी सिंचनासाठी दिला. एवढा निधी गेल्या १५ वर्षात कधीही दिला गेला नव्हता. या निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करा. आटपाडी तालुक्यातील शेतीसाठी सिंचन, रस्ते, एमआयडीसी यासह सर्व विकास कामांसाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहीन.
राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, आता आपण पाण्यासाठी एकत्र आलो, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना दु:ख होऊ लागले आहे. १७ वर्षात त्यांनी किती प्रेम दिले? माझे बंधू अमरसिंहांना उभे करून त्यांनीच पाडले. हे पॅकेज त्यांनी दिले. आपली प्रगती पाण्याच्या प्रश्नामुळे थांबली आहे. भाजपचे नेते दिलेला शब्द पूर्ण करतात, हा माझा अनुभव आहे. यावेळी पडळकर म्हणाले, अर्थमंत्र्यांनी आटपाडी तालुका दत्तक घ्यावा. या निवडणुकीत भाजप सर्व जागा जिंकणार आहे. त्यानंतरही तुम्ही तालुक्यावर कायमस्वरुपी लक्ष ठेवून विकास कामांसाठी पाठिंबा द्यावा.
यावेळी खरसुंडी जि. प. गटाचे भाजप पुरस्कृत उमेदवार ब्रह्मदेव पडळकर, अरुण बालटे, रुपेशकुमार पाटील, वंदना गायकवाड, तानाजी यमगर, दादासाहेब मरगळे, पुष्पलता जावीर, भूमिका बेरगळ, भाऊसाहेब गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)