कॉँग्रेस-राष्ट्रवादी समर्थकांत हाणामारी
By admin | Published: April 18, 2016 12:32 AM2016-04-18T00:32:27+5:302016-04-18T00:35:52+5:30
म्हैसाळ कालवा फोडल्यावरून वाद : माजी सभापतींच्या पुत्राचे अपहरण करून मारहाणीची तक्रार
मिरज : मिरज पूर्व भागात जानराववाडी व बेळंकी या गावात म्हैसाळचा कालवा फोडल्यावरून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. बाजार समितीचे माजी सभापती भारत कुंडले यांचा मुलगा प्रवीणकुमार कुंडले याचे अपहरण करून कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. प्रकरण मिटविण्यासाठी दोन्ही गटांच्या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
जानराववाडी गावातील शेतकऱ्यांनी म्हैसाळच्या पाण्यासाठी पाच लाख रुपये भरले आहेत. दि. ८ एप्रिलला सलगरे कालव्यातून जानराववाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सलगरे व बेळंकी येथील कालवा अडवून पाणी पळवित असल्याने जानराववाडीत पाणी पोहोचत नसल्याची तक्रार आहे. या कारणावरून जानराववाडीतील राष्ट्रवादी समर्थकांनी बेळंकीतील शहाजी गायकवाड यांच्या पुतण्यास जानराववाडीचे पाणी न अडविण्याबाबत शिवीगाळ, दमदाटी केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर शनिवारी सलगरे व जानराववाडी दरम्यान म्हैसाळचा कालवा फोडून पाणी वळविण्याचा प्रकार घडला. त्यानंतर प्रवीणकुमार कुंडले यास कॉँग्रेस समर्थकांनी उचलून बेळंकीत नेऊन मारहाण केल्याची तक्रार आहे.
याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजू मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले. याप्रकरणी भारत कुंडले यांनी शहाजी गायकवाड व त्यांच्या आठ ते दहा साथीदारांनी मुलगा प्रवीणकुमार कुंडले याचे अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार केली आहे. बेळंकीतील कॉँग्रेस नेते वसंत गायकवाड यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटविण्यासाठी दोन्ही गटाच्या बैठका सुरू होत्या. (वार्ताहर)
वाद मिटल्यानंतर पुन्हा मारामारी
पाचव्या टप्प्यातील सलगरे शाखा कालव्यातून सलगरे, जानराववाडी, खटाव परिसरात पाणी सोडले आहे. मात्र, शुक्रवारी रात्री अज्ञातांनी सलगरे ते जानराववाडी दरम्यान कालवा फोडून पाणी वळविले. यामुळे जानराववाडीतील शेतकरी आक्रमक झाले. खंडेराव जगताप, वसंत गायकवाड, भारत कुंडले, रावसाहेब बेडगे यांनी मध्यस्थी करून सलगरे, खटाव व जानराववाडीस प्रत्येकी दोन दिवस पाणी देण्याचा तोडगा काढला होता. परंतु पाण्याचा वाद मिटल्यानंतर मारामारीचा प्रकार घडल्याची माहिती मिळाली.