काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज भाजपमध्ये
By admin | Published: May 29, 2017 11:01 PM2017-05-29T23:01:31+5:302017-05-29T23:01:31+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज भाजपमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दहा नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या गळ्यात कमळ चिन्हाचा मफलर देऊन त्यांना प्रवेश देण्यात आला.
कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर येथे भाजपच्या मेळाव्यात त्यांनी भाजप प्रवेश केला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, आमदार महेंद्र लांडगे, प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, नीता केळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, डॉ. दिलीप येळगावकर, विनायक पावसकर, स्वप्निल भिंगारदेवे, रामकृष्ण वेताळ, दीपक पवार, जगदीश जगताप उपस्थित होते.
‘स्वाभिमानी’कडून काळे झेंडे
शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमुक्ती दिली जात नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येत आहे. कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांनी ‘आत्मक्लेश’ यात्रा काढली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टी यांना भेटायला गेलेला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही कर्जमुक्तीबाबत निर्णय घेतले जात नाही. याचा निषेध करीत मलकापूर येथे कृष्णा हॉस्पिटलसमोर सोमवारी, दुपारी दीड वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले.
यांचा पक्षप्रवेश
मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबा गावडे, माजी नगराध्यक्षा शारदा खिलारे यांच्यासह नगरसेविका यमुना घाडगे, वनिता लाखे, कऱ्हाड दक्षिण काँगे्रसचे प्रवक्ते मोहनराव जाधव, खटाव येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार यांच्यासह नवल थोरात, अधिक घाडगे, सुधीर पवार, दिलीप चव्हाण, सुनीता धायगुडे, दत्ताभाऊ सावंत. राष्ट्रवादीचे माजी उपजिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील यांच्यासह राजू पठाण, अमोल पाटील यांनी प्रवेश केला. महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह नगरसेवक कुमार शिंदे, श्रद्धा रोकडे, सुनीता आखाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.