जत पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी : उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आप्पासाहेब पवार , नीलेश बामणेंची स्वीकृत सदस्यपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:14 AM2018-01-05T00:14:49+5:302018-01-05T00:17:37+5:30
जत : जत नगरपालिकेत अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, उपनगराध्यक्षपदी आप्पासाहेब दुर्गाप्पा पवार यांची बिनविरोध निवड केली.
जत : जत नगरपालिकेत अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, उपनगराध्यक्षपदी आप्पासाहेब दुर्गाप्पा पवार यांची बिनविरोध निवड केली. ते राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे समर्थक आहेत. स्वीकृत सदस्य म्हणून नीलेश तानाजी बामणे यांची निवड झाली आहे. ते काँग्रेसचे नेते विक्रम सावंत समर्थक आहेत. दोन गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन विजयी मिरवणूक काढण्यात आली.
उपनगराध्यक्ष पदासाठी आप्पासाहेब पवार यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात येत आहे, असे नगराध्यक्षा बन्नेनवार यांनी जाहीर केले. स्वीकृत सदस्य पदासाठी इराण्णा निडोणी व नीलेश बामणे यांच्यात काँग्रेसअंतर्गत शेवटपर्यंत चुरस होती. शेवटच्या घटकेला बामणे यांचे नाव निश्चित झाले. काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या जादा होती. त्यामुळे प्रत्येकाला एक वर्ष संधी मिळणार आहे असे समजते.
भाजपने गटनेत्याची निवड केली नाही. त्यामुळे त्यांच्या स्वीकृत सदस्यांची निवड येत्या आठ तारखेला होणार आहे. काँग्रेसने गटनेतेपदी इकबाल गवंडी यांची, तर राष्ट्रवादीने स्वप्निल शिंदे यांची निवड केली आहे.
निवड जाहीर झाल्यानंतर मुख्याधिकारी हेमंत निकम, सुरेश शिंदे, रमेश पाटील, विक्रम सावंत, बाबासाहेब कोडग, सिध्दू क्षीरसाड, उत्तम चव्हाण, सुजय शिंदे, राजू मुल्ला, बाजी केंगार, गणेश गिड्डे आदी मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.
आप्पासाहेब पवार हे प्रभाग एकमधून निवडून आले आहेत. निवड जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष, गट-तट व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.
विशेष सभेत निवड
जत नगरपालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची युती झाली आहे. नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार यांनी उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवड करण्यासाठी गुरुवारी नगरपालिकेची विशेष सभा आयोजित केली होती. या विशेष सभेसाठी भाजप ७, काँग्रेस ७ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ असे एकूण २० नगरसेवक उपस्थित होते. यावेळी उपनराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड झाली.
जतच्या उपनगराध्यक्षपदी आप्पासाहेब पवार आणि स्वीकृत सदस्य म्हणून नीलेश बामणे यांची निवड झाली. त्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली.