काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे घोडे अडले
By admin | Published: November 2, 2016 12:18 AM2016-11-02T00:18:45+5:302016-11-02T00:18:45+5:30
जागा वाटप; नगराध्यक्षपदाचा तिढा : स्वबळाची भाषा, तरीही अकरा तारखेची प्रतीक्षा
दत्ता पाटील ल्ल तासगाव
तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्वबळाचे रणशिंंग फुंकून लढण्याची तयारी केली आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अद्याप आघाडीची चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांची आघाडीबाबत बैठक झाली असून, दोन जागांसाठी आघाडीचा पेच कायम असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून स्वबळ आजमावण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत (११ नोव्हेंबर) तोडगा निघून आघाडीची शक्यता नाकारता येत नाही, अशीदेखील चर्चा आहे.
तासगाव नगरपालिकेच्या २१ जागांसाठी २१५ अर्ज दाखल झाले आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी ३३ अर्ज दाखल झाले आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनच पक्षांनी सर्व जागांवर उमेदवार उभा केले आहेत. शेकाप, शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी या पक्षांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पॅनेल उभा करण्यात या पक्षांना अपयश आले आहे. अर्जांची छाननी दोन तारखेला होणार असून, अर्ज माघार ११ नोव्हेंंबर आहे. लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी ११ तारखेची वाट पाहावी लागणार आहे, हे स्पष्ट आहे. मात्र तत्पूर्वी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात एकत्रित लढण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरु असल्याची चर्चा आहे. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपूर्वी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आघाडीबाबत चर्चा झाली होती, मात्र जागा वाटपाबाबतचा तोडगा निघाला नसल्याने ही चर्चा लांबणीवर पडली.
अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत दोन्ही पक्षांतून जागा वाटपाबाबतचा सन्मानजनक तोडगा निघाल्यास, दोन्ही पक्षांची आघाडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र तोडगा निघाला नाही, तर तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजपला लक्ष्य केले जात होते. खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात दोन्ही पक्षांचा सूर जुळल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यामुळे भाजपविरोधात आघाडीची खलबते सुरु झाली. मात्र जागा वाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने आघाडीचा निर्णय अधांतरी राहिला आहे.
जागा वाटपाबाबत आमदार सुमनताई पाटील आणि आमदार पतंगराव कदम यांची चर्चा सुरु असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगितले जात आहे. त्यामुळे ऐनवेळी अर्ज माघारीच्या क्षणापर्यंत आघाडीची शक्यता होऊ शकते. दोन्ही पक्षांकडून सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर मात्र तिरंगी लढत पाहायला मिळणार, हे नक्की.
आघाडीसाठी काँग्रेसला नगराध्यक्षपद आणि निम्म्या जागा असा फॉर्म्युला ठेवण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार कमकुवत आहेत. त्यांनी मोकळ्या जागा भरण्याचे काम केले आहे. पालिकेचा अभ्यास असलेला एकही सक्षम उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही. याउलट काँग्रेसकडे अभ्यासू आणि अनुभवी उमेदवार आहेत. त्यामुळे आघाडी करुन राष्ट्रवादीचे घोंगडे गळ्यात घेण्यापेक्षा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
- महादेव पाटील तालुकाध्यक्ष, काँग्रेस
काँग्रेससोबत आघाडीच्या अनुषंगाने अर्ज दाखल करण्यापूर्वी बैठक झाली होती. राष्ट्रवादीसाठी नगराध्यक्षपद आणि सोळा जागा आणि काँग्रेसला उपनगराध्यक्षपद आणि पाच जागा बाबत चर्चा झाली होती. काँग्रेसकडून या फॉर्म्युल्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आघाडीत पेच निर्माण झाला आहे. आता वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्यात बोलणी सुरु आहेत. सन्मानजनक तोडगा निघाल्यास आघाडी होऊ शकते, अन्यथा स्बबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे.
- अमोल शिंंदे,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी.