काँग्रेसची विधानसभा तयारी गटबाजीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 11:29 PM2019-06-30T23:29:19+5:302019-06-30T23:29:25+5:30
अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीत गटबाजीमुळे स्वत:च्या पायावर कुºहाड मारुन घेतल्यानंतरही, काँग्रेसमधील नेत्यांनी अद्याप ...
अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लोकसभा निवडणुकीत गटबाजीमुळे स्वत:च्या पायावर कुºहाड मारुन घेतल्यानंतरही, काँग्रेसमधील नेत्यांनी अद्याप बोध घेतलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या पहिल्याच बैठकीत गटबाजीचे उघड दर्शन घडवून, पुन्हा संघर्षाची वाट नेते व कार्यकर्त्यांनी स्वीकारल्याचे चित्र दिसत आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसअंतर्गत गटबाजीने कहर केला. तीन गटात विभागल्या गेलेल्या पक्षाचे तिकीट मित्रपक्षांच्या पदरात पडले. पक्षाची हक्काची जागा गेल्यानंतर काँग्रेस भवनाला टाळे ठोकण्याचा प्रकारही घडला. संपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले. प्रदेशाध्यक्षांनाही येथील नेत्यांची कानउघाडणी करावी लागली. त्यानंतरही फारसा फरक पक्षीय वातावरणात झाला नाही. लोकसभा निवडणुकीत लागलेले गटबाजीचे ग्रहण विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम आहे. कधी उमेदवारी नको म्हणून वाद, कधी उमेदवारी आणि पक्षाचे चिन्ह हवे म्हणून मारामारी, तर कधी उमेदवारीचा डंका पिटला म्हणून संघर्ष... अशा अनेक गोष्टींनी काँग्रेसचे अंतर्गत वातावरण दूषित झाले आहे.
शनिवारी सांगलीत पक्षीय निवडणूक प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेस नेते व वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेबद्दल टीका केली. पृथ्वीराज पाटील यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर करून पक्षाकडूनही सकारात्मक प्रतिसाद असल्याचे म्हटले होते.
या गोष्टीवरून काँग्रेसच्या दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. वास्तविक इच्छुक व्यक्ती नेहमीच पक्षाकडून तिकीट मिळण्याचा दावा करीत असते. तशी दावेदारी पाटील यांनी केली होती. नेमकी हीच गोष्ट पक्षांतर्गत विरोधी कार्यकर्त्यांना पसंत पडली नाही. त्यांनी पृथ्वीराज पाटील यांना लक्ष्य केले. जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी वादावर पडदा टाकला असला तरी, हा वाद अंतर्गत धुमसत राहणार हे निश्चित.
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सांगली लोकसभा व विधानसभा मतदारसंघ ओळखला जात होता. पक्षांतर्गत वादावादीत मश्गुल राहिलेल्या नेत्यांमुळे हा बालेकिल्ला ढासळला. भाजपने नेमकी संधी साधत हा गड केव्हाच काबीज केला आहे. एकामागोमाग एक संस्था, मतदारसंघ हातातून जात असतानाही, काँग्रेसने त्यातून काहीही शिकण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट गटबाजीला आणखी धार देण्याचे काम सर्वांनी मिळून केले. आता ही धार स्वकीयांनाच संपविण्यासाठी वापरली जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारास ही गटबाजीच घातक ठरण्याची चिन्हे आहेत.
उमेदवारीवरून : पक्षात तीन गट
पृथ्वीराज पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली असली तरी, पक्षात तीन गटातून इच्छुक पुढे येण्याची चिन्हे आहेत. यामध्ये मदन पाटील गटातर्फे काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जाणार आहे. विशाल पाटील यांच्या गटातूनही ऐनवेळी उमेदवारीबाबत मागणी केली जाऊ शकते. अद्याप त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसली तरी, इच्छुकांमागून गटबाजीचे अस्तित्व या निवडणुकीत राहण्याची दाट शक्यता आहे.
निकालावरूनही संशयकल्लोळ
लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार व काँग्रेस नेते विशाल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर, काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात व भागात कमी मते पडल्यावरून संशयकल्लोळ सुरू आहे. हा कल्लोळ अजूनही शांत झालेला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसअंतर्गत वातावरणावर उमटण्याची चिन्हे आहेत.