पलूसमध्ये काँग्रेसला जबरदस्त धक्का

By admin | Published: February 23, 2017 11:02 PM2017-02-23T23:02:35+5:302017-02-23T23:02:35+5:30

भाजप-राष्ट्रवादीला यश : कॉँग्रेसला गटबाजीचा फटका

Congress pulsates in Palus | पलूसमध्ये काँग्रेसला जबरदस्त धक्का

पलूसमध्ये काँग्रेसला जबरदस्त धक्का

Next

किरण सावंत--पलूस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. येथे भाजप-राष्ट्रवादी युतीने मोठे यश मिळविले आहे. या पराभवामुळे कॉँग्रेसवर मात्र आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
पलूस तालुका हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पाचही जागांवर कॉँग्रेसने विजय मिळविला होता, तर पंचायत समितीवरही सत्ता काबीज केली होती. मात्र या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या चारही जागा कॉँग्रेसने गमावल्या आहेत. तालुक्यात भाजप व राष्ट्रवादीने योग्यवेळी युती करुन कॉँग्रेसला शह दिल्याने, भाजपने तीन, तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली.
माजी आ. पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला. आमदार डॉ. पतंगराव कदम यांना शह देण्यासाठी योग्य रणनीती आखली व त्यामध्ये ते यशस्वी ठरले.
पलूस तालुका कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र जिल्हा परिषद व समितीतील अनपेक्षित अपयशामुळे आमदार डॉ. पतंगराव कदम यांना मोठा धक्का बसला आहे. प्रत्येक गावात कॉँग्रेसमध्ये असणाऱ्या अंतर्गत गटबाजीमुळेच पराभव झाल्याचे मानले जात आहे. कॉँग्रेसचा पराभव कॉँग्रेसच करु शकते, हे पुन्हा सिध्द झाले असून, या जबरदस्त पराभवानंतर आता आमदार डॉ. कदम गावोगावी असणाऱ्या गटबाजीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पराभवाने कॉँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. डॉ. कदम यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नेते व कार्यकर्ते कमी पडल्याचेच या पराभवाने सिध्द झाले आहे.
मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुंडल जिल्हा परिषद गटातही आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड विजयी झाले आहेत. दुधोंडी, भिलवडी व अंकलखोप जि. प. गटातही भाजपने मुसंडी मारली. केवळ पंचायत समितीच्या आमणापूर व वसगडे गणातच कॉँग्रेसला यश आले.


सत्तेला सुरुंग
पंचायत समितीमध्ये आठपैकी चार जागा भाजपने, तर दोन जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. कॉँगे्रसला दोन जागा मिळाल्या. कॉँग्रेसच्या पंचायत समितीतील दहा वर्षाच्या सत्तेला भाजप-राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे.

Web Title: Congress pulsates in Palus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.