सांगली लोकसभेच्या मैदानातून विशाल पाटील यांची माघार नाहीच, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय
By अशोक डोंबाळे | Published: April 22, 2024 02:37 PM2024-04-22T14:37:23+5:302024-04-22T14:40:21+5:30
महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली; अपक्ष, छोट्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज माघारीसाठी प्रयत्न
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारीची सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यापूर्वी अपक्ष, छोट्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी माघार घेणार नाही हे स्पष्ट केल्यामुळे सांगली लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
विशाल पाटील यांनी सोमवारी सकाळी कार्यकर्ते आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये, अशी सूचना घोरपडे, जगताप यांनी विशाल पाटील यांना दिली आहे. त्यानुसार विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाने काही कारवाई केली तरी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, अपक्ष, छोट्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज माघारी घेऊन आपली अडचण कमी करण्यासाठी भाजप आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे प्रयत्न चालू आहेत.