जत तालुक्यातील काँग्रेस ‘रिचार्ज’
By admin | Published: September 2, 2016 11:37 PM2016-09-02T23:37:44+5:302016-09-03T01:06:21+5:30
नगरपरिषद पोटनिवडणूक : तालुक्याच्या राजकारणावर निकालाचे दूरगामी परिणाम
जयवंत आदाटे -- जत नगरपालिका प्रभाग क्रमांक पाचमधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर जत शहरासह तालुक्यातील कॉँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. अत्यंत चुरशीने लढविल्या गेलेल्या या निवडणुकीच्या निकालाचे तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
हणमंत कोळी यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्यानंतर तेथे रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. परंतु या पोटनिवडणुकीला सार्वत्रिक निवडणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते. आमदार विलासराव जगताप, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, माजी सभापती सुरेश शिंदे यांनी या निवडणुकीत भाग घेतला होता. त्यामुळे उमेदवारापेक्षा हे नेतेच एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, असे चित्र प्रभागात निर्माण झाले होते. त्यामुळे ही निवडणूक नेतेमंडळींनी प्रतिष्ठेची केली होती. यामुळे निवडणूक निकालाकडे जत तालुक्यासह जिल्ह्यातील नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते. कॉँग्रेस पक्षाची उमेदवारी नबीसाहेब ऊर्फ मुन्ना पखाली यांना मिळाली होती. जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, तालुका कॉँग्रेस कमिटी अध्यक्ष पी. एम. पाटील व त्यांचे समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे.
भारतीय जनता पक्षाची उमेदवारी रमजान ऊर्फ बंटी नदाफ यांना मिळाली होती. आमदार विलासराव जगताप यांनी स्वत: वैयक्तिक लक्ष घालून प्रचार केला होता. परंतु दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी प्रभावी प्रचार केला नाही. सुरूवातीस त्यांनी प्रचारात आघाडी घेऊन हवा निर्माण केली होती. परंतु प्रत्यक्ष मतदानात मात्र ते पिछाडीवर राहिले. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
शरणाप्पा आक्की यांनी कॉँग्रेसअंतर्गत बंडखोरी करून निवडणूक लढविली होती. माजी सभापती सुरेश शिंदे व मन्सूर खतिब आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी चुरशीने प्रचार केला. प्रत्येक मतदारापर्यंत ते पोहोचले होते. मागील चार वर्षात जत शहरात कोणतेही ठोस काम झाले नाही. त्यामुळे मतदार सुरेश शिंदे समर्थक नगरसेवकांवर नाराज आहेत. पालिकेत त्यांची सत्ता असूनही त्यांना ते शक्य झाले नाही. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला आहे. याची क बुलीही त्यांनी जाहीर सभेत दिली होती.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची उमेदवारी शफीक ऊर्फ मोहोद्दीन इनामदार यांना मिळाली. नेतेमंडळींचा अभाव व प्रभावी प्रचारयंत्रणा नसल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. महाआघाडीच्यावतीने अशोक कोळी यांनी निवडणूक लढविली. गौतम ऐवळे व अजित पाटील यांनी प्रचार सभा घेऊन वातावरण तापवले होते. परंतु मतदारांची सहानुभूती त्यांना मिळाली नाही.
कॉँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले पखाली एकमेव नगरसेवक पालिकेत आहेत. यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँगे्रसअंतर्गत वादामुळे निवडणूक चिन्ह मिळाले नव्हते. सध्या पालिकेत सुरेश शिंदे व विक्रम सावंत गटाची एकत्रित सत्ता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यातील फरक जत शहरातील नागरिकांना कळेनासा झाला आहे.
आगामी निवडणुकीला सामोरे जाताना यापुढील काळात सत्ताधाऱ्यांना ठोस कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जावे लागणार आहे. याची तयारी त्यांना यापुढील एका वर्षभरात करावी लागणार आहे.
वर्षाची संधी : तरीही लाखो खर्च
जत नगरपरिषदेची आगामी निवडणूक केवळ एक वर्षावर येऊन ठेपली आहे. यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवारास केवळ एकच वर्षाची संधी मिळणार, हे स्पष्ट होते. असे असतानाही निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली गेली. निवडणूक प्रचारात नेतेमंडळी व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप केले. प्रचारात शहराच्या विकासात भर घालणारा कोणताही प्रमुख मुद्दा नव्हता. शहरातील वाहतूक व्यवस्था, भाजी मंडई, खराब रस्ते, सार्वजनिक कचऱ्याची विल्हेवाट आदी प्रमुख प्रश्न असूनही त्यावर कोणतीच चर्चा झाली नाही. एक वर्षासाठी ही निवडणूक झाली. त्यानंतर सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तरीही उमेदवारांनी प्रचारासाठी लाखो रूपयांचा खर्च केला आहे.
कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे आव्हान
आगामी वर्षभरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. या निवडणूक निकालामुळे कॉँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्याचा फायदा त्यांना पुढील निवडणुकीत होणार आहे. परंतु नेतेमंडळींनी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांना एकत्र आणणे आवश्यक आहे.