महापौर कांबळे यांना हटविण्यासाठी काँग्रेसच सरसावली!
By admin | Published: November 2, 2015 11:46 PM2015-11-02T23:46:10+5:302015-11-02T23:57:22+5:30
जयश्रीतार्इंना साकडे
सांगली : महापौर विवेक कांबळे यांना पदावरून हटविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसमधील एका गटाने कंबर कसली आहे. महापालिकेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सोमवारी कांबळे यांना महापौर पदाचा राजीनामा देण्याची सूचना केली; पण कांबळे यांनी त्यावर विचार करू, असे उत्तर देत राजीनाम्याला बगल दिली. दरम्यान, काही नगरसेवकांनी जयश्रीताई मदन पाटील यांची भेट घेऊन महापौर हटावसाठी साकडे घातले.
महापौरपद मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित आहे. पालिकेत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा सांगलीतून कांचन कांबळे यांना महापौर पदाची संधी देण्यात आली. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची निवड केली होती. त्यांनी सतरा महिने महापौर पदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर सत्ताधारी गटाचे नेते मदन पाटील यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. फेब्रुवारी महिन्यात नव्या महापौरांची निवड होऊन विवेक कांबळे यांनी पदभार स्वीकारला. कांबळे यांच्या निवडीवेळीच सत्ताधारी गटातून त्यांच्या नावाला विरोध सुरू झाला होता. त्याचवेळी उर्वरित सव्वावर्षात दोन ते तीन महापौर होतील, असे सांगितले जात होते.
आता दहा महिने झाले असून, अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. येत्या फेब्रुवारीत नव्या महापौरांची निवड होणार आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांसाठी अन्य नगरसेवकांना संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसमधून सुरू झाली आहे. मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. विद्यमान महापौरांना पदावरून हटविण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी कंबर कसली आहे. सोमवारी काँग्रेस पक्षाची बैठक झाल्यानंतर एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने महापौर दालनात कांबळे यांची भेट घेतली.
मदन पाटील यांनी कांबळे यांचा राजीनामा घेण्यास सांगितले होते. त्यांच्या इच्छेनुसार राजीनामा द्यावा, असे सांगितले.कांबळे यांनी, मदनभाऊंनी राजीनाम्याचा विषय कोणासमोर काढला होता, कोणकोणत्या नगरसेवकांना त्यांनी निरोप दिला होता, असे उलट प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, मदनभाऊंच्या निधनानंतर त्यांच्या गटाची सूत्रे त्यांच्या पत्नी जयश्रीताईंकडे आहेत. सोमवारी काही पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी जयश्रीताई यांनाही महापौरांचा राजीनामा घेण्याचे साकडे घातले. यासंदर्भात नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांच्याशी त्या चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)
शह-काटशह आणि माघारीचे राजकारण
महापौर विवेक कांबळे यांनी पदभार घेतल्यापासून गेल्या दहा महिन्यांत अनेक वादविवाद झाले. महासभेत अनेकदा महापौरांना आपलाच निर्णय मागे घेण्याची वेळ आली. पाणी खासगीकरण, वित्त आयोगाचा निधी यांसह अनेक विषय त्यांनी रद्द केले. सभागृहातही त्यांना काँग्रेसच्या गटाची फारशी साथ मिळालेली नाही. मध्यंतरी महापौर कांबळे व स्थायी समितीचे सभापती संजय मेंढे यांच्यात उघड संघर्ष झाला होता. प्रत्येकवेळी महासभेतील ऐनवेळचे ठराव हा कळीचा मुद्दा ठरला आहे. पालिकेतील पडद्यामागील शह-काटशहामुळेच त्यांची कारकीर्द गाजत आहे.