काँग्रेस आघाडीच्या मुहूर्तालाच खडा

By admin | Published: April 24, 2017 11:39 PM2017-04-24T23:39:18+5:302017-04-24T23:39:18+5:30

पुन्हा गटबाजीचे दर्शन : विशाल पाटील समर्थक, इद्रिस नायकवडी गटाचा एकत्र येण्यास विरोध

Congress stands for the front of the alliance | काँग्रेस आघाडीच्या मुहूर्तालाच खडा

काँग्रेस आघाडीच्या मुहूर्तालाच खडा

Next



शीतल पाटील ल्ल सांगली
लोकसभा, विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आता एकमेव सत्ताकेंद्र हातात असलेल्या महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकविण्यासाठी आघाडी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मुहूर्तालाच खडा लागला असून, काँग्रेसमधील विशाल पाटील समर्थक व माजी महापौर इद्रिस नायकवडी गटाने या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गटबाजीचे दर्शन निवडणुकीपूर्वी वर्षभर आधीच सुरू झाले आहे.
एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्याचे राजकारण गेल्या पाच वर्षात वेगाने बदलले आहे. दोन्ही काँग्रेसच्या हातातील सत्ताकेंद्रे भाजपच्या ताब्यात गेली आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष बॅकफूटवर गेले. त्यातून दोन्ही पक्षांच्या जिल्हा नेतृत्वाने कोणताच धडा घेतला नसल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून आले. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या सत्ताकेंद्रात भाजप झिरो टू हिरो ठरला. त्यातून अखेरीस बोध घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीचे संकेत दिले.
दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची घोषणा होऊन आठवडा लोटण्यापूर्वीच त्याला विरोध सुरू झाला आहे. विशेषत: महापालिका क्षेत्रातील काँग्रेसमधील नेतेमंडळींनी आघाडीला विरोध सुरू केला आहे. त्याचा प्रत्यय रविवारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीतही आला. मिरजेचे नेते माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी उघडपणे राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास विरोध केला. ज्यांच्याशी आम्ही संघर्ष करीत आहोत, त्यांच्याशी आघाडी करणार असाल तर आम्हाला जमेत धरू नका, असा इशारा देण्यासही ते विसरले नाहीत. इद्रिस नायकवडी कधीकाळी राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या काळात ते महापौरही बनले. पण नंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी बिनसल्याने ते काँग्रेसवासी झाले. पण येथेही त्यांचे मन फारसे रमलेले नाही. गेल्या चार वर्षात निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याची तक्रार ते नेहमीच करतात. त्यातून पदाधिकारी निवडणुकीत कुरघोड्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे काँग्रेसला मागासवर्गीय समिती, स्थायी समितीचे सभापतीपद बहुमत असतानाही गमवावे लागले आहे. मध्यंतरी त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. पण आजअखेर ती केवळ चर्चाच ठरली आहे.
अजून महापालिका निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असल्याने नायकवडी यांनी पत्ते गुलदस्त्यातच ठेवले आहेत.
दुसरीकडे विशाल पाटील समर्थकांनाही आघाडीचा निर्णय पचनी पडलेला दिसत नाही. त्यामुळेच या नगरसेवकांनी कॉँग्रेस बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. आघाडीचा निर्णय घेताना माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील यांनाही विश्वासात घेण्याची आवश्यकता होती, पण काँग्रेस नेत्यांनी परस्परच निर्णय जाहीर केल्याचे मत एका नगरसेवकाने व्यक्त केले. या साऱ्या घडामोडींमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसमोर आतापासून विघ्न आले आहे. जिल्ह्यातील भाजपचा चढता आलेख पाहता दोन्ही पक्षातील बहुतांश विद्यमान नगरसेवकांना आघाडीचे वेध लागले आहे. भाजपचा वारू रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास निश्चित चांगला निकाल लागेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. पण मुहूर्तालाच खो बसल्याने आघाडीचे भवितव्य काय असेल, हे कळण्यासाठी आणखी काही महिने थांबावे लागेल.
चारचा प्रभाग : काहींना लाभ, काहींना तोटा
महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग असेल. त्यानुसार महापालिका प्रशासनाला नवीन प्रभाग रचना करावी लागणार आहे. ही नवी प्रभाग रचना विद्यमान नगरसेवकांतील काहींना लाभदायक, तर काहींना अडचणीची ठरणार आहे. विशेषत: मिरजेतील राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत. मिरजेचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकांना भाजपपेक्षा दोन्ही पक्षातील विरोधकांशीच सामना करावा लागतो. त्यामुळे उमेदवारी मिळविताना अनेकांची कसरत होईल. त्यातून उमेदवारी न मिळाल्यास भाजपचा पर्यायही त्यांच्यासमोर असेल. सांगली व कुपवाडमध्येही काही प्रभागात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर काही प्रभाग एकत्र जोडल्यास दोन्ही काँग्रेसला फायदा होऊ शकतो. पण सत्तेच्या चाव्या भाजपकडे असल्याने ते प्रभागरचनेवेळी काय चमत्कार करतात, यावर पुढील गणिते अवलंबून राहणार आहेत.

Web Title: Congress stands for the front of the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.