खानापूरच्या पूर्व भागात काँग्रेसचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:58 PM2017-10-22T23:58:15+5:302017-10-22T23:58:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
खानापूर : खानापूर पूर्व भागातील कॉँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींची सत्ता हस्तगत करीत बाजी मारली. येथील चौदापैकी आठ ग्रामपंचायतीत कॉँग्रेसने, तर सहा ग्रामपंचायतीत शिवसेनेने वर्चस्व प्राप्त केले. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेणापूर ग्रामपंचायतीत सुहास शिंदे गटाने, तर बलवडी (खा.) येथे तानाजी पाटील गटाने सत्ता कायम राखली.
खानापूर पूर्व भागातील पळशी गावाने टेंभूच्या पाण्यासाठी बहिष्कार टाकला होता. उर्वरित चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने झाल्या. ऐनवाडी, जाधववाडी, रामनगर, हिवरे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. उर्वरित ग्रामपंचायतीत सत्ताधाºयांनी सत्ता कायम राखली.
ऐनवाडीत सत्तांतर घडले. कॉँग्रेसच्या सरपंचपदाच्या उमेदवार सौ. सजुबाई भीमराव तुपे यांनी विजय संपादन केला. सदस्य पदाच्या सर्व सातही जागा जिंकल्या. विद्यमान सरपंच बाळासाहेब पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. जाधववाडीतही सत्तांतर करताना कॉँग्रेसचे सरपंचपदाचे उमेदवार प्रकाश पवार यांनी विजय मिळविला. नऊ सदस्य पदांपैकी कॉँग्रेसने पाच, पांडुरंग मुळीक गटाने तीन, तर शिवसेनेने एक जागा जिंकली. येथेही विद्यमान सरपंच महादेव जाधव पराभूत झाले. गोरेवाडीत कॉँग्रेसने सत्ता कायम राखताना सातपैकी पाच जागा जिंकल्या. सरपंच पदाच्या निवडणुकीत शोभा गायकवाड यांनी विजय मिळविला. प्रभाग २ मधील शिवसेनेच्या उमेदवार वैशाली विजय सुतार यांनी, समान मते मिळाल्यानंतर चिठ्ठी टाकून झालेल्या निर्णयात विजय मिळविला.
जखीणवाडी ग्रामपंचायतीची सत्ता कायम राखताना शिवसेनेच्या बापूराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व जागा जिंकून पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. सदस्य पदाच्या सात जागांसह सरपंचपदी श्रीमती नटुबाई हणमंत शिंदे यांची निवड झाली. मोही येथेही शिवसेनेने सत्ता कायम राखली. सरपंच पदाच्या निवडणुकीत शोभा अशोक गोसावी विजयी झाल्या, तसेच सदस्य पदाच्या पाच जागा जिंकल्या. कॉँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. धोंडेवाडीतही शिवसेनेने सत्ता राखली. मात्र निवडणूक झालेल्या तीन जागांवर विरोधकांनी बाजी मारली. बिनविरोध झालेल्या दोन जागा शिवसेनेच्या असून, दोन जागा रिक्त आहेत. सरपंचपदी महेंद्र घोरपडे विजयी झाले. ते दुसºयांदा सरपंचपद भूषविणार आहेत. रामनगर येथे सत्तांतर घडविताना शिवसेनेने चार जागा जिंकल्या. कॉँग्रेसला एक जागा मिळाली, तर दोन जागा रिक्त राहिल्या. सरपंचपदी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार अभय सखाराम थोरात विजयी झाले.
सर्वात मोठी करंजेची ग्रामपंचायत शिवसेनेने पुन्हा ताब्यात ठेवली. येथे तिरंगी लढतीत शिवसेनेचे सात, तर भानुदास सूर्यवंशी गटाचे चार उमेदवार विजयी झाले. सरपंचपद निवडणुकीत सौ. कलावती जगन्नाथ रास्ते यांनी विजय मिळवला.
सुलतानगादेची सत्ता कायम राखताना कॉँग्रेसने सर्व सातही जागा जिंकल्या. सरपंचपदी नूरमंहमद शिकलगार विजयी झाले.
हिवरे ग्रामपंचायतीत सत्तांतर घडले. येथे शिवसेनेस तीन जागांवर समाधान मानावे लागले, तर विरोधकांनी सहा जागांवर विजय मिळविला. सरपंच पदाच्या निवडणुकीत रामकृष्ण सुतार विजयी झाले. ताडाचीवाडीत शिवसेनेने सत्ता कायम राखताना सरपंचपदी अनिल मंडले विजयी झाले. बाणूरगडात कॉँग्रेसची सत्ता अबाधित राहिली. येथे सरपंचपदी विद्यमान उपसरपंच सज्जन बाबर विराजमान झाले. बिनविरोध पाच व निवडणूक झालेल्या दोन जागांवर कॉँग्रेसने विजय मिळविला.
बलवडीत तानाजी पाटील : यांची बाजी
बलवडी (खा.) येथील सत्ता कायम राखताना राष्टÑवादीच्या तानाजी पाटील यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत बाजी मारली. या निवडीत त्यांच्या पत्नी सौ. सविता पाटील विजयी झाल्या. मात्र त्यांना नऊपैकी चार सदस्य पदांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेस पाच जागा मिळाल्या. विद्यमान सरपंच सौ. मालती गायकवाड यांना पराभवास तोंड द्यावे लागले.