आबांच्या जतमधील दौऱ्याने काँग्रेस अस्वस्थ
By admin | Published: July 13, 2014 12:58 AM2014-07-13T00:58:17+5:302014-07-13T01:08:02+5:30
जागावाटपाचा तिढा : राष्ट्रवादीची विधानसभेसाठी ‘फिल्डिंग’
जयवंत आदाटे / जत
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी मागील महिन्यात चारवेळा जत तालुक्याचा दौरा करून जत विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याचे सांगून, उमेदवारी कोणाला द्यायची ते नंतर बघू, सर्वजण कामाला लागा, अशी सूचना केली आहे. त्यांचा आदेश मानून कार्यकर्ते कामाला लागल्यामुळे कॉँग्रेस पक्षातील इच्छुकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गुड्डापूर, कुडनूर आणि जत येथील लग्नसमारंभ व शेगाव येथील शहीद जवानावरील अंत्यसंस्कार कार्यक्रम यानिमित्ताने गृहमंत्री पाटील यांनी एका महिन्यात चारवेळा जत तालुक्याचा दौरा केला आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप यांच्या विरोधकांना एकत्र करून त्यांना राजकीय पाठबळ देण्याचा प्रयत्नही या दौऱ्याच्या निमित्ताने पाटील यांनी सुरू ठेवला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकपूर्व वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांतील कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जागावाटप निश्चित मानले जात असले, तरी जत व शिराळ्याचे जागावाटप अनिश्चित आहे. मागीलवेळी जतची जागा राष्ट्रवादीकडे होती. आता ती कॉँग्रेससाठी जाहीर झाली, तर शिराळ्याची जागा राष्ट्रवादीकडे जाईल किंवा जतची जागा राष्ट्रवादीला मिळाली, तर शिराळा कॉँग्रेसकडे जाईल, असे सांगितले जाते. शिराळ्यात राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार मानसिंगराव नाईक यांना उमेदवारी मिळणार की, काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्या पारड्यात श्रेष्ठींचे वजन पडणार, यावर जतची गणिते आधारलेली आहेत. मग गृहमंत्री पाटील जत येथील जागावाटप निश्चित नसताना कामाला लागा म्हणून कसे काय सांगत आहेत, असा सवालही विचारला जात आहे. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. राष्ट्रवादीकडून पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रभाकर जाधव, चन्नाप्पा होर्तीकर यांची नावे चर्चेत आहेत, तथापि प्रभाकर जाधव यांनी तयारीही सुरू केली आहे.
कॉँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जादा आहे. त्यामुळे जत तालुक्यातील कॉँग्रेस पक्ष एकसंध राहिलेला नाही. गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून सर्वच इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे आकाडीच्या निमित्ताने गावपातळीवरील बैठकांना गती आली आहे. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नातेवाईक व भारती बँकेचे संचालक विक्रम सावंत, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे यांची नावे चर्चेत आहेत.
विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे यांनी महायुतीकडून भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून, आपण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ, असा दावा केला आहे; परंतु हा दावा वास्तवात आणण्यात अनेक अडसर आहेत. मागील निवडणुकीत तालुक्यातील कॉँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना निवडून आणले होते. त्यांना ज्यांनी निवडून आणले होते, तेच सर्वजण यंदा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. याशिवाय शेंडगे यांच्या साडेचार वर्षाच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसची तीच मंडळी नाराज असल्याचे जाहीरपणे सांगितले जाते. त्यामुळे शेंडगे यांची दमछाक सुरू झाली आहे.