बाजार समितीत काँग्रेसला हव्यात ९, ठाकरे गटाला चार जागा; महाआघाडीच्या बैठकीत मागणी

By अशोक डोंबाळे | Published: April 15, 2023 12:51 PM2023-04-15T12:51:57+5:302023-04-15T12:52:28+5:30

ठाकरे गट दोन पावले मागे जात सहावरून चार जागांवर आला असून त्यापैकी दोन जागा माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाला आहेत. राष्ट्रवादीने मात्र जागांवरील दावा राखून ठेवला आहे.

Congress wants 9, Thackeray group four seats in market committee; Demand in the meeting of the Grand Alliance | बाजार समितीत काँग्रेसला हव्यात ९, ठाकरे गटाला चार जागा; महाआघाडीच्या बैठकीत मागणी

बाजार समितीत काँग्रेसला हव्यात ९, ठाकरे गटाला चार जागा; महाआघाडीच्या बैठकीत मागणी

googlenewsNext

सांगली : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चेची पहिली फेरी शुक्रवारी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसने नऊ जागांची मागणी केली असून त्यात जत तालुक्यातील पाच तर मिरजेतील चार जागांचा समावेश आहे. ठाकरे गट दोन पावले मागे जात सहावरून चार जागांवर आला असून त्यापैकी दोन जागा माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाला आहेत. राष्ट्रवादीने मात्र जागांवरील दावा राखून ठेवला आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, जितेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, मनोज शिंदे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, दिगंबर जाधव यांची सांगलीत शुक्रवारी बैठक झाली.

बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी विरोधात भाजप आणि तिसरी आघाडी अशी होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. त्यामुळे जागा वाटपावरून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. काँग्रेसकडून नऊ जागांचा प्रस्ताव बैठकीत ठेवला आहे. जत तालुक्यात पाच तर मिरज तालुक्यात चार जागांची मागणी आहे.

ठाकरे गटाची सहा जागांची मागणी होती. मात्र, शुक्रवारच्या बैठकीत चार जागा देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यापैकी दोन जागा ठाकरे गटाला आणि उर्वरित दोन जागा घोरपडे गटाला देण्याची मागणी आहे. बैठकीला तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित असले तरी राष्ट्रवादीकडून जागांवर दावा केला गेला नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून जागांची मागणी केली जाईल. दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर जयंत पाटील आणि काँग्रेस नेते डॉ. विश्वजित कदम चर्चा करणार आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा अंतिम निर्णय दि. १९ एप्रिलला होईल.

महाविकासच्या बैठकीला विशाल पाटील यांची दांडी
बाजार समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील अनुपस्थित होते; परंतु पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांकडे मिरज तालुक्यासाठी चार जागांची मागणी केली आहे. जागा देताना अन्य कोणत्याही नेत्याने हस्तक्षेप करू नये, असा प्रस्ताव आहे.
 

Web Title: Congress wants 9, Thackeray group four seats in market committee; Demand in the meeting of the Grand Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली