जिल्हा परिषदेवर कॉँग्रेसची सत्ता आणणार
By admin | Published: September 6, 2016 10:37 PM2016-09-06T22:37:38+5:302016-09-06T23:47:01+5:30
मोहनराव कदम : खरसुंडी येथे कॉँग्रेस कार्यकर्ता मेळावा, प्रचारसभांची सुरूवात
खरसुंडी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर स्वतंत्र निवडणूक लढवून एकहाती सत्ता प्रस्थापित करेल, असा विश्वास कॉँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मोहनराव कदम यांनी व्यक्त केला.
खरसुंडी (ता. आटपाडी) येथे नाथनगरीच्या राम कृष्ण गुरव शाळेच्या सभागृहात कॉँग्रेसचा आटपाडी तालुका कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना कदम बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कॉँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, कॉँग्रेस युवक नेते जयदीप भोसले, जिल्हा बॅँकेचे शशिकांत देठे, मार्केट कमिटी संचालक विजय पुजारी, कॉँग्रेसचे आटपाडी तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड, युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल गायकवाड, कॉँग्रेसचे जिल्हा नेते सतेज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना कदम म्हणाले, कॉँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणारा पक्ष आहे. कॉँग्रेस पक्षाने देशात व राज्यात सत्ता असताना अनेक योजना सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्गासाठी राबविल्या आहेत. सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडणारा, परंपरा असलेला हा पक्ष आहे. त्यामुळे दुसऱ्यावर टीका न करता कार्यकर्त्यांनी सामान्यांपर्यंत पोहोचून युती शासनाने जाहिरातबाजी करून, फसवी आश्वासने देऊन जनतेची कशी फसवणूक केली आहे, याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रामाणिकपणे काम करावे. आजवर गटबाजीमुळे कॉंग्रेसचे नुकसान झाले आहे. यापुढे आपापसातील गटबाजीला थारा न देता एकसंध होऊन काम करावे. आतापासूनच युवक कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातील प्रभागात लक्ष घालून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला सुरूवात करावी, असेही ते म्हणाले.
यावेळी खरसुंडी विकास सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जयराम पुजारी यांचा सत्कार मोहनराव कदम यांच्याहस्ते करण्यात आला.
कॉँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष जयदीप भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन काका भोसले यांच्या विचारांचा वारसा चालवत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कॉँग्रेसचे नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मदतीने आटपाडी तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर आहे. नेलकरंजी (खरसुंडी) जिल्हा परिषद गटात चालू असलेली कामे ही मोहनराव कदम यांनीच सुचविलेली असून, तीच कामे चालू आहेत. तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कॉँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मोहनकाका भोसले यांना मानणाऱ्या सर्वांना एकत्र आणून पुढील निवडणुकीत कॉँग्रेसची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहे.
यावेळी प्रदीप पाटील, विलास पाटील, अॅड. विलास देशमुख, मोहन खरात, प्रकाश जाधव, शिवाजी पाटील, रामहरी इंगवले, बाळासाहेब निचळ, नानाभाऊ पुजारी, पांडुरंग भिसे, स्वप्नील जाधव, अनिल जरंडकर, सदाभाऊ ढगे, योगेश पुजारी यांच्यासह कॉँग्रेसचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
टार्गेट ठरवा : एकत्र आल्यास विजय पक्का
यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील म्हणाले, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीत कॉँग्रेसची सत्ता आणण्यासाठी निवडणुकीत आपला शत्रू कोण? आपले टार्गेट काय? याचा विचार करून एकत्र लढा दिला पाहिजे. खरसुंडी गावाच्या राजकारणाचे उदाहरण ताजे असल्याचे त्यांनी सांगितले. खरसुंडी विकास सोसायटी निवडणुकीत शिवसेना विरुध्द सर्व गट एकत्र येऊन १३ विरुध्द ० असे यश संपादन केले. शिवाय गावच्या सरपंचाने स्वत:चे टार्गेट फिक्स क रून पक्षांतर केले. असे असताना कॉँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील जिरवाजिरवीचे राजकारण न करता एकसंध होऊ न येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्या पक्षाच्या शत्रू विरुध्दच निवडणूक लढवण्यास जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आपली सत्ता येण्यास काहीच अडचण राहणार नसल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.