यंदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासजमा होणार: योगी आदित्यनाथ
By अविनाश कोळी | Published: May 1, 2024 09:58 PM2024-05-01T21:58:29+5:302024-05-01T21:59:25+5:30
सांगलीत भाजपची प्रचार सभा, काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदुंचे विभाजन.
लाेकमत न्यूज नेटवर्क, सांगली : काँग्रेसने लोकांच्या आस्थेचा सन्मान कधीच केला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यांचे केवळ दोनच आमदार निवडून आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातून काँग्रेस इतिहासजमा होईल, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर बुधवारी भाजपची प्रचार सभा पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजपचे नेते शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, नीता केळकर, पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जनसुराज्य पक्षाचे नेते समीत कदम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, मनसेचे तानाजी सावंत आदी उपस्थित होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसच्या काळात संविधानिक संस्था भ्रष्टाचाराने बरबटल्या होत्या. भाजपने त्या भ्रष्टाचारातून मूक्त केल्या. अनेक वर्षे सत्तेवर असूनही आयोध्येत काँग्रेसला राम मंदिर उभारता आले नाही. भाजपने मंदिर उभारल्यानंतरही आजअखेर एकही काँग्रेस नेता मंदिरात आला नाही. केवळ व्होटबँक जपण्याचे काम काँग्रेस करीत आहे. आस्थेचा सन्मान त्यांनी कधीच केला नाही.
देशात काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदुंच्या विभाजनाचा धोका आहे. जाती-धर्माच्या नावावर विभाजन करुन सत्तेवर राहण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. हिंदुंच्या अधिकारावर ते दरोडा टाकतील. गोमांस विक्रीला खुली परवानगी देऊन या देशात मोठे पाप करण्याच्या विचारात ते आहेत. त्यामुळे अशा आस्थेशी खेळणाऱ्या पक्षाला रोखण्याची जबाबदारी जनतेची आहे.
मुघल म्युझियमचा डाव उधळला
आग्रा येथे काँग्रेसच्या काळात मुघल म्युझियम उभारण्याचा डाव होता. आम्ही तो उधळून लावला. आता त्याठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे संग्रहालय उभारत आहोत, असे आदित्यनाथ म्हणाले.
ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांकडे जाणार
काँग्रेस सत्तेवर आल्यास ओबीसींचे आरक्षण कपात करुन ते मुस्लिम समाजाला देण्यात येणार आहे. मुस्लिम व्होट बँक सांभाळण्यासाठीच त्यांची धडपड सुरु आहे, अशी टीका आदित्यनाथ यांनी केली.
कामगारांना देशोधडीला लावले
संजय पाटील म्हणाले, विशाल पाटील यांनी अनेक सहकारी संस्था बंद पाडल्या. कामगारांना देशोधडीला लावले. आजपर्यंत केवळ स्वत: सुखात राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे अशा विचारधारेच्या माणसाला जनताच जागा दाखवेल.
आदित्यनाथ यांना डमरु भेट
आदित्यनाथ यांना सभास्थानी गणपतीची प्रतिमा आणि मिरजेच्या कलाकारांनी तयार केलेले डमरू वाद्य भेट दिले. यावेळी योगी यांनी डमरु वाजवून लोकांना अभिवादन केले.