पुणे ते बंगळुरू महामार्गावरील टोल वसुली काँग्रेस बंद पाडणार: पृथ्वीराज पाटील
By अशोक डोंबाळे | Published: July 31, 2024 08:39 PM2024-07-31T20:39:22+5:302024-07-31T20:39:36+5:30
सांगली, कऱ्हाडचे कार्यकर्ते तासवडेमध्ये आंदोलन करणार
अशोक डोंबाळे/सांगली, लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पुणे ते बंगळुरू रस्त्याची चाळण झाली आहे. सांगली, कोल्हापुरातून पुण्यात जायला सहा ते सात तास वेळ लागतोय. जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल आकारणी करू नये, यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात शनिवारी, दि. ३ रोजी एकावेळी चार टोलनाक्यांवर आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बुधवारी दिली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, आमदार विक्रम सावंत, आमदार संजय जगताप, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांच्यासह चार जिल्ह्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बुधवारी ऑनलाइन बैठक झाली. त्यात या आंदोलनाची दिशा निश्चित केली.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, या बैठकीत पुणे-बंगळुरू रस्त्याच्या स्थितीवर गंभीर चर्चा झाली. वाहनधारकांचे खूप हाल होत आहेत. रस्ता लवकर झाला पाहिजे. त्यासाठी दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. शिवाय, टोलवसुलीला विरोध करणेही गरजेचे झाले आहे. कारण, रस्त्याचे काम पूर्ण नसताना शंभर टक्के रक्कम वसुली करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे आंदोलन चार टोलनाक्यांवर केले जाईल. कोल्हापूरचे लोक किणीला, सांगली व कराडचे लोक तासवडेत, साताऱ्यातील लोक आणेवाडीत, तर पुण्याचे लोक खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलनाला उतरतील. त्या दिवशी आम्ही सगळी वाहने टोल न घेता सोडणार आहोत. ती सूचना असेल, त्यानंतर आक्रमक आंदोलन उभे राहील.