शहराच्या विकासात काँग्रेसचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:15+5:302021-01-09T04:21:15+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रातील विकासात काँग्रेसच्या नगरसेवकांनी नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता नसतानाही वर्षा निंबाळकर यांनी ...
सांगली : महापालिका क्षेत्रातील विकासात काँग्रेसच्या नगरसेवकांनी नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता नसतानाही वर्षा निंबाळकर यांनी कोट्यवधीचा निधी खेचून आणला आहे, असे प्रतिपादन कृषिराज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांनी केले.
प्रभाग क्रमांक १० मधील एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे उद्घाटन डाॅ. कदम यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर उपस्थित होते. यावेळी एकता काॅलनीतील खुला भूखंडाचे विकास, न्यू सर्वोदय काॅलनीत रस्ते व गटारी, जलाराम कुटीर हाऊस, बालहनुमान घरकुल परिसरातील गटारीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
कदम म्हणाले की, राज्यात महाआघाडीचे सरकार आहे तर महापालिकेत विरोधकांची सत्ता आहे. तरीही आम्ही शहराचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शहराच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. सत्ता असो अथवा नसो, काँग्रेसचा नगरसेवक जनतेची सेवा करण्यासाठी सदैव कार्यरत असतो. महिला सदस्य असूनही वर्षा निंबाळकर व अमर निंबाळकर यांनी प्रभागाचा विकास करण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेत आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही बळ उभा करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, नितीन कापडणीस यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास नगरसेवक मनोज सरगर, मंगेश चव्हाण, माजी नगरसेवक विशाल कलकुटगी, प्रशांत पाटील उपस्थित होते.