मदनभाऊंविरोधात कॉँग्रेसची ‘फिल्डिंग’
By admin | Published: June 17, 2015 11:25 PM2015-06-17T23:25:31+5:302015-06-18T00:39:09+5:30
जिल्हा बॅँकेतील राजकारणाचे पडसाद : बाजार समितीत धक्का देण्याची तयारी
अविनाश कोळी -सांगली -जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या जहाजातून उडी मारून जयंत पाटील यांच्या जहाजात गेलेले कॉँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्याविरोधात कॉँग्रेसअंतर्गत राजकारण पेटले आहे. मदनभाऊंना जिल्हा बॅँकेप्रमाणेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतही धक्का देण्यासाठी कदम गटासह वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व विशाल पाटील सक्रिय झाले आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच कॉंग्रेसला सोडून मदन पाटील यांनी त्यांचेच कट्टर राजकीय विरोधक असलेल्या जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी केली होती. मदन पाटील यांच्या या कृतीवर विश्वासघाताचा शिक्का मारून कॉंग्रेस नेत्यांनी ताकद एकवटली. जिल्हा बँकेच्या रणांगणात विशाल पाटील यांनी कदम गट व राष्ट्रवादीच्या एका गटाला हाताशी धरून मदन पाटील यांना पराभूत केले होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनपेक्षित यश मिळविल्याने कॉंग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर आता बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस नेत्यांनी मदनभाऊंच्याविरोधात ‘फिल्डिंग’ लावली आहे. यात विशाल पाटील आणि प्रतीक पाटील आघाडीवर आहेत.
सांगली बाजार समितीचा विस्तार मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात आहे. या संस्थेवर वसंतदादा घराण्याचेच ५६ वर्षे वर्चस्व होते. सुरुवातीला वसंतदादा पाटील, त्यानंतर विष्णुअण्णा व नंतर मदन पाटील गटाचीच सत्ता राहिली. याला अपवाद केवळ गतवेळची निवडणूक राहिली. वसंतदादा घराण्यातच आता फूट पडल्याने मदनभाऊंसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी मदनभाऊंशिवाय बाजार समिती लढविण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा झाल्यानंतर लगेचच गेल्या पाच ते सहा दिवसात कॉंग्रेसच्या नेत्यांनी जत आणि कवठेमहांकाळमध्ये जाऊन त्यादृष्टीने तयारी केली आहे. प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांचीही दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांशी पहिल्या टप्प्यातील चर्चा पूर्ण झाली आहे. नाराज असलेल्या घोरपडे गटाची ताकद आता कॉंग्रेसच्या नेत्यांना लाभल्याने त्यांच्या हालचालींना गती आली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जत, मिरज तालुक्यातील सोसायटी गटात अशाच राजकारणातून कॉंग्रेसने राष्ट्रवादी, भाजपच्या नेत्यांना तसेच मदन पाटील गटाला धक्का दिला होता. त्यामुळे बाजार समितीसाठी अगदी त्याचपद्धतीने तयारी सुरू झाली आहे. कवठेमहांकाळमध्ये कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नव्हते, मात्र बाजार समितीमध्ये ही उणीव भरून काढण्यासाठी नेते तयारीला लागले आहेत.
दुसरीकडे खासदार संजय पाटील, आ. जयंत पाटील, आ. विलासराव जगताप, मदन पाटील यांनी बाजार समितीसाठीची चर्चा सुरू केली आहे. मदनभाऊंच्या जोरावर बाजार समिती काबीज करण्यासाठी जयंतरावांनी ‘कार्यक्रम’ आखला असला तरी, आक्रमक झालेल्या कॉँग्रेस नेत्यांमुळे त्यांना आणखी कसरत करावी लागणार आहे. खासदार पाटील व आ. जगताप यांच्यावरच बाजार समितीच्या रणनीतीची जबाबदारी जयंतरावांनी सोपविली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडूनच सध्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पतंगरावांचीही ताकद
४जिल्हा बॅँकेप्रमाणेच बाजार समितीच्या निवडणुकीतही पतंगरावांनी कॉँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना पाठबळ दिले आहे. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसात पतंगराव मैदानात उतरल्यामुळे बराच फरक पडला होता. त्यामुळे कॉँग्रेसच्या नेत्यांनीच गत आठवड्यात पतंगरावांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीतही असेच पाठबळ देण्याची विनंती केली होती. पतंगरावांनी कॉँग्रेस नेत्यांना त्याबाबतीत हिरवा कंदील दर्शविला आहे.
जिल्हा बॅँक कळीचा मुद्दा
जिल्हा बॅँकेतील मदन पाटील-जयंत पाटील युतीने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. जिल्हा बॅँकेत जुन्या सहकाऱ्यांसोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण मदन पाटील यांनी निवडणुकीवेळी दिले होते. त्यांच्या या तात्पुरत्या निर्णयाने सांगलीतील आणि कॉँग्र्रेसअंतर्गत राजकारणावर दीर्घकाळ परिणाम होतील, अशी चिन्हे दिसत आहेत.
घोरपडेही कॉँग्रेसकडे
खासदार संजय पाटील व अजितराव घोरपडे यांच्यात रुंदावलेली दरी आता कॉँग्रेसच्या हिताची ठरत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत घोरपडे कॉँग्रेसच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे कॉँग्रेसच्या प्रयत्नांना आता धार आली आहे. दुसरीकडे घोरपडे आणि दादा गट एकत्र आल्यामुळे खासदार गटात अस्वस्थता दिसत आहे.