काँग्रेसचे रणशिंंग; भाजप, राष्ट्रवादीची व्यूहरचना

By admin | Published: October 24, 2016 12:28 AM2016-10-24T00:28:15+5:302016-10-24T00:28:15+5:30

तासगाव नगरपालिका निवडणूक : शिवसेना, शेकापकडूनही उमेदवारांची शोधमोहीम सुरू

Congress's Ranching; BJP, NCP's strategy | काँग्रेसचे रणशिंंग; भाजप, राष्ट्रवादीची व्यूहरचना

काँग्रेसचे रणशिंंग; भाजप, राष्ट्रवादीची व्यूहरचना

Next

दत्ता पाटील ल्ल तासगाव
तासगाव नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसांत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंंग फुंकले आहे, तर भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी स्वत: तासगावात तळ ठोकून व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडूनही उमेदवारीसाठी चाचपणी सुरु केली आहे. शिवसेना, शेकापकडूनही उमेदवारांची शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरात निवडणुकीची हवा गरम होण्यास सुरुवात झाली आहे.
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अनपेक्षितरित्या काही दिवस आगोदरच जाहीर झाला. त्यामुळे तयारीअगोदरच निवडणुकीच्या परीक्षेस सामोरे जाण्याची वेळ सर्वच पक्षांवर आली आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांचे नेते आणि इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवारांच्या जुळवाजुळवीपासूनच यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे चित्र आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीचे रणशिंंग फुंकले आहे. तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत तासगावच्या अस्मिता आणि विकासाचा मुद्दा घेऊन रिंगणात उतरण्याचे संकेत महादेव पाटील यांनी दिले आहेत. सत्ताधारी भाजपला टार्गेट करुन निवडणुकीचा आखाडा गाजवण्याची तयारी काँग्रेसकडून सुरु आहे.
राष्ट्रवादीनेही शहरात झालेल्या राजकीय पडझडीतून सावरुन निवडणुकीसाठी मार्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पदावर नगरसेवक अमोल शिंंदे यांची नियुक्ती करुन राष्ट्रवादीने निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अद्याप सक्रिय झाले नसल्याचे चित्र आहे. मात्र शहरातील पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे, तर राष्ट्रवादीतील बहुतांश इच्छुकांनी आपापल्या प्रभागात लक्ष केंद्रित करून निवडणुकीचा सराव सुरू केला आहे.
सत्ताधारी भाजपसमोर पालिकेतील सत्ता कायम ठेवून भाजपची आणि खासदार संजयकाका पाटील यांची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडून अद्याप जाहीरपणे कोणतीच हालचाल होताना दिसून येत नाही. मात्र आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी दोन दिवस तासगावात तळ ठोकून इच्छुक उमेदवार आणि जनतेच्या पसंतीस उतरणारे उमेदवार यांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपची ताकद कमकुवत असणाऱ्या प्रभागातील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधून शहरात भाजपची कमांड पक्की करण्यासाठी गोपनीय बैठका सुरु केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत खासदार संजयकाका स्वत: लक्ष घालून एकहाती सत्ता आणण्यासाठी व्यूहरचना करत असल्याचे चित्र आहे. या पक्षांबरोबरच शिवसेना, शेतकरी कामगार पक्षानेही निवडणुकीत नशीब अजमावण्यासाठी तयारी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण?थेट नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झाले आहे. भाजपकडून माजी नगरसेवक मोहन कांबळे यांचे नाव आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादीकडून सूतगिरणीचे संचालक राहुल कांबळे यांचे नाव आघाडीवर आहे, तर दोन्ही पक्षांतून ऐनवेळी नवखा उमेदवार रिंगणात उतरला जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल? याची तासगावकरांत उत्सुकता आहे. मात्र अद्याप सर्वच नेत्यांनी याबाबतचे पत्ते उघड केले नाहीत.
 

Web Title: Congress's Ranching; BJP, NCP's strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.