स्थायी सभापतिपदी काँग्रेसचे संजय मेंढे
By admin | Published: December 5, 2014 12:33 AM2014-12-05T00:33:25+5:302014-12-05T00:47:07+5:30
राष्ट्रवादीचा पराभव : ‘मनसे’ची काँग्रेसला साथ
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय मेंढे यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नगरसेवक विष्णू माने यांचा दहा विरुद्ध पाच मतांनी पराभव केला. या निवडणुकीत मनसेच्या शांता जाधव यांनी काँग्रेसला साथ दिली, तर स्वाभिमानीचे जगन्नाथ ठोकळे तटस्थ राहिले. काँग्रेसअंतर्गत नाराजीचा फायदा उठविण्याचे विरोधकांचे मनसुबे मात्र धुळीस मिळाले.
स्थायी सभापतिपदासाठी काल, बुधवारी काँग्रेसतर्फे संजय मेंढे व राष्ट्रवादीच्यावतीने विष्णू माने यांनी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसमधील नाराज गट व स्वाभिमानी आघाडीची साथ घेऊन सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचे विरोधकांचे प्रयत्न होते. त्यादृष्टीने काल दिवसभर हालचालीही गतिमान झाल्या होत्या.
पालिकेतील राजाभाऊ जगदाळे सभागृहात आज, गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सभागृहात नायकवडी गटाच्या हसिना नायकवडी अनुपस्थित होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली होती.
लोखंडे यांनी अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला. माघारीची मुदत संपतानाच नायकवडी या सभागृहात आल्याने काँग्रेसने सुटकेचा नि:श्वास टाकला. राष्ट्रवादीचे उमेदवार विष्णू माने यांना अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती संजय मेंढे यांनी केली. माने यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी मेंढे यांना दहा, तर माने यांना पाच मते मिळाली. गटनेते किशोर जामदार हे सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते. सभागृहात स्वाभिमानी आघाडीच्या दोन सदस्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली. मनसेच्या शांता जाधव यांनी मेंढे यांना पाठिंबा दिला, तर जगन्नाथ ठोकळे तटस्थ राहिले. या निवडीनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रवेशद्वारावर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, गटनेते किशोर जामदार, सुरेश आवटी, हारुण शिकलगार, स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज यांनी मेंढे यांचा सत्कार केला.
विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी स्थायी व महिला बालकल्याण सभापतिपद ताब्यात घेऊन पालिकेत सत्तांतर करण्याची मनीषा बाळगली होती; पण त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. काँग्रेसचे सर्व सदस्य एकसंध असल्याचे या निवडीवरून सिद्ध झाले. काँग्रेसमध्ये कोणताही वाद अथवा गट-तट नाही.
-किशोर जामदार, काँग्रेसचे गटनेते
सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहोत. मिरजेतील भाजी मंडई व सांगलीतील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ.
- संजय मेंढे, सभापती, स्थायी समिती
महिला बालकल्याण सभापतिपदी पुष्पलता पाटील
स्थायी सभापतीबरोबरच महिला व बालकल्याण सभापतिपदाची निवडणूकही झाली. या पदासाठी काँग्रेसकडून पुष्पलता पाटील व राष्ट्रवादीतून प्रार्थना मदभावीकर यांनी अर्ज दाखल केले होते.
या निवडणुकीत पुष्पलता पाटील यांना नऊ, तर मदभावीकर यांना पाच मते मिळाली. स्वाभिमानी आघाडीच्या वैशाली कोरे व संगीता खोत या दोन सदस्या गैरहजर राहिल्या. पुष्पलता पाटील यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.