बनावट नोटांचे ‘कनेक्शन’ पश्चिम बंगालपर्यंत आंतरराज्य टोळी : सूत्रधाराचे नाव निष्पन्न; पथक मुंबईस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:44 PM2018-08-30T23:44:45+5:302018-08-30T23:46:05+5:30
सांगली : दोन हजाराच्या बनावट नोटा चलनात आणून देशाची आर्थिक व्यवस्था ढासळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कल्याण टोळीचे पश्चिम बंगालपर्यंत ‘कनेक्शन’ असल्याचे गुरुवारी तपासात निष्पन्न झाले. राणा शेख हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या शोधासाठी शहर पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. ही टोळी पश्चिम बंगालमधून दोन हजाराच्या नोटा मागवून त्या राज्यभर चलनात आणत होती, अशी माहितीही तपासातून पुढे आली आहे.
सांगलीत दोन हजाराच्या बनावट नोटा खपविणाºया राज राजकुमार उज्जेनवाल सिंह (वय २८) यास गेल्या आठवड्यात पकडण्यात आले होते. त्याचे साथीदार प्रेमविष्णू रोगा राफा (२६) व नरेंद्र आशापाल ठाकूर (३३, तिघे रा. कल्याण) यांनाही अटक करण्यात यश आले होते. सध्या तिघेही पोलीस कोठडीत आहेत. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून टोळीचा सूत्रधार राणा शेख याचे नाव निष्पन्न झाले आहे. तो मूळचा पश्चिम बंगालमधील आहे. त्याच्यामार्फतच ही टोळी दोन हजाराच्या बनावट नोटा मागवून घेत होती. त्यानंतर ते राज्यातील विविध शहरात जाऊन या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत होते. सांगलीतही ते आठ दिवसांपासून तळ ठोकून होते. या काळात त्यांनी अनेक ठिकाणी या बनावट नोटा चलनात आणल्या. पण मुख्य बसस्थानकाजवळ एका चिरमुरे दुकानात नोट खपविताना सापडले होते.पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे तपास करीत आहेत.
शिंदे यांचे पथक तपासासाठी चार दिवसांपूर्वी कल्याणला जाऊन आले आहे. आता राणा शेख याचे नाव निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी पथक गुरुवारी सायंकाळी पुन्हा मुंबईला रवाना झाले आहे. एका दोन हजाराच्या नोटेमागे टोळीतील प्रत्येक सदस्याला घसघशीत कमिशन मिळत होते. ही नोटही हुबेहूब असल्याने अजिबात संशय येत नव्हता. त्यामुळे टोळीचा हा उद्योग बिनदिक्कतपणे सुरु होता. राणा शेख सापडल्यास यामागील मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
पुन्हा तेच...
सांगली, मिरजेत बनावट नोटा चलतान आणण्याचा प्रयत्न करीत असताना अनेकदा टोळ्या सापडल्या आहेत. या टोळ्यांचे ‘कनेक्शन’ पश्चिम बंगाल निघाले होते. आताच्या प्रकरणातही हेच कनेक्शन निघाले आहे. गरज पडल्यास पोलिसांचे पथक तपासासाठी पश्चिम बंगालला रवाना होणार आहे. सध्याच्या तपासात मुंबई व कल्याण पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.