राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आघाडीची जुळवाजुळव

By Admin | Published: January 20, 2017 11:28 PM2017-01-20T23:28:34+5:302017-01-20T23:28:34+5:30

रेठरेहरणाक्ष गट राखीव : इच्छुकांचे मनसुबे धुळीस, सर्वपक्षीय आघाडीची घोषणा; मात्र शिवसेनेचा स्वबळाचा नारा

Connection of NCP's Citadel | राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आघाडीची जुळवाजुळव

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आघाडीची जुळवाजुळव

googlenewsNext


प्रशांत चव्हाण, निवास पवार ल्ल ताकारी / शिरटे
वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष जिल्हा परिषद मतदारसंघ इतर मागासवर्गीय पुरुष प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला कोणत्याही परिस्थितीत काबीज करण्याचे मनसुबे विरोधी गटाचे आहेत. मंत्री सदाभाऊ खोत यांनी सर्वपक्षीय आघाडीची घोषणा केली असली, तरी शिवसेनेने मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. एकास एक लढत झाल्यास ही निवडणूक लक्षवेधी व चुरशीची होणार आहे.
रेठरेहरणाक्ष गटात रेठरेहरणाक्ष व किल्लेमच्छिंद्रगड पंचायत समिती गणाचा समावेश आहे. रेठरेहरणाक्ष गण इतर मागासवर्गीय पुरुष प्रवर्गासाठी, तर किल्लेमच्छिंद्रगड गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. रेठरेहरणाक्षचे बाळासाहेब मोरे यांनी १५ वर्षे जिल्हा परिषदेत काँगे्रसचा झेंडा फडकवत ठेवला होता. पुढे येडेमच्छिंद्रचे प्रकाश पाटील यांच्या जि. प. निवडणुकीतील खळबळजनक विजयाने काँग्रेसला उभारी आली होती.
अलीकडे राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे अनेक निष्ठावंत नाराज आहेत. राष्ट्रवादीतील काही इच्छुकांनी स्वत:च उमेदवारी जाहीर करुन पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक, अन्यथा विरोधी गटाची कास धरू, असा पवित्रा काहींनी घेतला आहे. विद्यमान जि. प. सदस्या सुनीता वाकळे यांच्या संपर्काअभावी मतदार संघात नाराजी आहे. याचा फटकाही राष्ट्रवादीला बसू शकतो. त्यामुळे उमेदवार निवडताना राष्ट्रवादीला झाऱ्यातून पाणी शोधून घ्यावे लागणार आहे.
हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असला तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वाढलेली ताकद, इस्लामपूर नगरपालिकेतील विकास आघाडीला मिळालेले यश, केंद्रात व राज्यात असणारे भाजपचे सरकार व सदाभाऊ खोत यांना मिळालेले मंत्रीपद ही विरोधकांची जमेची बाजू आहे. आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी खोत यांनी राष्ट्रवादीतील काही मोहरे वळविण्यासाठी चाली खेळल्या आहेत. त्यामध्ये ते कितपत यशस्वी होतात, हे स्पष्ट होईलच.
रेठरेहरणाक्ष जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीकडे रेठरेहरणाक्षचे विद्यमान उपसरपंच धनाजी बिरमुळे, तानाजी कोळेकर, विवेक अवसरे, राहुल कोळेकर, अजित कोळेकर, नंदकुमार कोळेकर, संदीप माळी, ज्ञानदेव माळी, शिरटे येथून डी. वाय. तांदळे, तर येडेमच्छिंद्र येथून शिवाजी सुतार यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. विरोधी गटाकडून रेठरेहरणाक्षचे शरद अवसरे, दिलीप कोळेकर, हरिभाऊ कुंभार, किल्लेमच्छिंद्रगडचे सुनील पुजारी यांची नावे चर्चेत आहेत.
रेठरेहरणाक्ष पं. स. गणातून राष्ट्रवादीकडून भवानीनगरचे शामराव मोरे, येडेमच्छिंद्र येथील माजी उपसरपंच प्रकाश लोहार, अभियंता सचिन हुलवान प्रबळ दावेदार आहेत, तर विरोधी विकास आघाडीतून गणेश हराळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. बिचूदचे संदीप पाटील हेही इच्छुकांच्या यादीत आहेत. येडेमच्छिंद्र येथील अर्जुन देशमुख यांनी १५ दिवसांपूर्वीच शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याचे जाहीर करुन प्रचाराची सुरुवात केली आहे.
किल्लेमच्छिंद्रगड पं. स.साठी नरसिंहपूर येथून वाळवा तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सौ. सुस्मिता जाधव, शिरटे येथून तालुका सदस्या सौ. जयश्री निवास पवार, कृष्णाचे माजी संचालक हणमंतराव पाटील यांच्या स्रुषा सौ. सुरेखा गुलाबराव पाटील, कोळे येथून सौ. अलकादेवी आबासाहेब पाटील, सौ. अरुणा जीवन जाधव, किल्लेमच्छिंद्रगडमधून पं. स. सदस्य सुनील पोळ यांच्या पत्नी सौ. विजया पोळ, सौ. सारिका राहुल निकम, सौ. मंजुश्री तानाजी यादव, सौ. सविता हणमंत मोरे, सौ. सुरेखा तुकाराम मठकरी यांची मागणी आहे, तर विकास आघाडीकडून सौ. वैशाली शशिकांत साळुंखे यांनी उमेदवारी निश्चित मानून प्रचारास सुरुवात केली आहे.
रेठरेहरणाक्ष जिल्हा परिषद मतदार संघात एकूण १० गावे आहेत. रेठरेहरणाक्ष पंचायत समिती गणात रेठरेहरणाक्ष, भवानीनगर, बिचूद व येडेमच्छिंद्र या गावांचा समावेश आहे. किल्लेमच्छिंद्रगड पंचायत समिती गणात किल्लेमच्छिंद्रगड, लवणमाची, बेरडमाची, कोळे, नरसिंहपूर व शिरटे या गावांचा समावेश आहे.

Web Title: Connection of NCP's Citadel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.