समविचारी लोकांना एकत्रित घेऊ
By admin | Published: July 2, 2015 11:30 PM2015-07-02T23:30:44+5:302015-07-02T23:30:44+5:30
पतंगराव कदम : बाजार समिती निवडणूक; तालुका नेत्यांना अधिकार
सांगली : काँग्रेसच्या नेत्यांसह समविचारी लोकांना बरोबर घेऊन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविण्यात येईल, असे मत माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, बाजार समितीच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही चर्चा किंवा बैठक झालेली नाही. त्यात तालुक्यांचे कार्यक्षेत्र असल्यामुळे त्या-त्या तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनीच याबाबतचे निर्णय घ्यायचे आहेत. माझ्याशी त्यांची चर्चा झालेली नाही. चर्चेवेळी याबाबतचे धोरण ठरेल. काँग्रेसमधील लोकांना प्राधान्य देऊन समविचारी लोकांना एकत्रित करून बाजार समितीची निवडणूक लढवली जाईल.
ऊस दराबाबत ते म्हणाले की, साखर कारखान्यांसाठी पॅकेज जाहीर केले असले तरी, महाराष्ट्राच्या वाट्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत. यासंदर्भातील केंद्र व राज्य शासनाचा घोळ सुरूच आहे.
जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ व टेंभू योजनेच्या उर्वरित कामांना आघाडी सरकारच्या कालावधित गती मिळाली होती. आता या योजना गोगलगायीच्या गतीने सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत या योजना नव्या सरकारला पूर्ण कराव्याच लागतील. आम्ही त्याबाबतचा पाठपुरावा करीत आहोत, असेही ते म्हणाले.
सध्याच्या सरकारचे सिंचन योजनांकडे दुर्लक्ष होत आहे का?, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, लक्ष असले तर दुर्लक्ष होईल ना! लोकांना सर्व गोष्टी दिसत आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला. (प्रतिनिधी)
राज्यभर मोर्चे काढणार
विविध प्रश्नांवर सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ आणि १0 जुलै रोजी मोर्चे काढून निदर्शने केली जातील. सांगलीतील मोर्चा ९ जुलै रोजी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सध्या सर्वांत गंभीर आहे. असे सर्वच प्रश्न आम्ही अधिवेशनात उपस्थित करणार आहोत, अशी माहिती पतंगराव कदम यांनी दिली.
बाजार समितीत मदन पाटील-जयंत पाटील यांच्यात युती झाली आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर कदम म्हणाले की, त्यांच्या युतीबाबत मला काहीही माहिती नाही. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून बाजार समितीबाबत निर्णय घेतला जाईल.