अनिल परब यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:22 AM2021-05-30T04:22:11+5:302021-05-30T04:22:11+5:30
सांगली : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची किती दखल घ्यावी हा प्रश्न आहे. असे कोणीही आरोप ...
सांगली : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची किती दखल घ्यावी हा प्रश्न आहे. असे कोणीही आरोप करू लागले तर त्यातील तथ्य तपासणे आवश्यक असून, परब यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.
कोरोना उपाययोजना आढावा बैठकीसाठी आलेल्या पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपांतील पत्राचा ड्राफ्ट विशिष्ट पद्धतीचा आहे. असे आरोप व्हायला लागले तर त्याची दखल किती घ्यायची हा प्रश्नच आहे. आरोपात तथ्य किती हेही तपासणे आवश्यक असून, चौकशी निष्पक्षपातीपणे होणार आहे.
मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीबद्दल ते म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी प्रयत्न केले आणि राज्य शासन त्यासाठी कटिबद्ध आहे. आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट करावी. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या भेटीघाटी सुरू केल्या आहेत. संसदेत दबाव आणावा यासाठी त्यांची मागणी आहे. राज्य शासनही याच मागणीवर ठाम असून, आता केंद्रानेच आपली भूमिका स्पष्ट करावी.
चौकट
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील
राज्यातील काही भागात कोरोनाबाधितांचे प्रमाण घटत आहे, तर काही भागात रुग्णसंख्या कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यायची की वाढ आणि एकूण नियमावलीबाबत आता मुख्यमंत्री स्वत: निर्णय घेणार आहेत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.