मतदारसंघ प्रश्नांच्या ढिगाऱ्यात; रोहित पाटील राज्याच्या दौऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:03 PM2023-11-30T13:03:10+5:302023-11-30T13:04:20+5:30

रोहित पाटील यांची संघर्ष यात्रा मतदारसंघात उलटसुलट चर्चेचा विषय ठरली आहे.

Constituency issues piled up in kavthe mahankal; Rohit Patil on state tour with rohit pawar | मतदारसंघ प्रश्नांच्या ढिगाऱ्यात; रोहित पाटील राज्याच्या दौऱ्यात

मतदारसंघ प्रश्नांच्या ढिगाऱ्यात; रोहित पाटील राज्याच्या दौऱ्यात

दत्ता पाटील

सांगली - तासगाव-कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघात शेतीच्या पाण्यापासून ते तरुणांच्या रोजगारापर्यंत, रखडलेल्या विकासकामांपासून कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेपर्यंत समस्यांचा मोठा ढिगारा तयार झाला आहे. मात्र राष्ट्रवादीकडून भावी आमदार म्हणून चर्चेतील युवा नेते रोहित पाटील हा ढिगारा इथेच सोडून, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासमवेत युवा संघर्ष यात्रेत राज्याच्या दौऱ्यात सहभागी आहेत. त्यामुळे रोहित पाटील यांची संघर्ष यात्रा मतदारसंघात उलटसुलट चर्चेचा विषय ठरली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या वारसदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, आमदार सुमनताई पाटील आणि युवा नेते रोहित पाटील हे शरद पवार यांच्यासोबत दिसून आले, आमदार रोहित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून रोहित हे काही महिन्यांपासून राष्ट्रवादीची धुरा सांभाळताना दिसून येत आहेत. यात्रेच्या माध्यमातून रोहित यांचा दौरा सुरू आहे. रोहित राज्यभर दौरा करत आहेत, मात्र तासगाव- कवठेमंकाळ मतदार संघातील जनता समस्यांच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहे. मतदार संघात सत्ताधारी खासदार आणि विरोधक आमदार असे दोन वजनदार नेते असूनही समस्यांचा निपटारा करण्यात सपशेल अपयश आले आहे. 

मतदार संघातील वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश करावा यासाठी रोहित पाटलांनी उपोषण केले. मात्र त्याचा पाठपुरावा करता आला नाही, हा प्रश्न तसाच आहे. मणेराजुरी परिसरातील मिनी एमआयडीसीचा प्रकल्प अखेर कागदावरच राहिला आहे. द्राक्ष व बेदाणा उत्पादकांच्या समस्या, कर्जदार शेतकऱ्यांचे रखडलेले प्रोत्साहन अनुदान, डबघाईला आलेली सूतगिरणी, तासगाव शहराचा रिंगरोड, पंचायत समितीची मोडकळीस आलेली इमारत, असे एक ना अनेक समस्यांचे ढिगारे आहेत. समस्यांचा निपटारा करून मतदारसंघातील जनतेला दिलासा देण्याऐवजी आमदारकीचे वेध लागलेले रोहित पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर असल्याने चर्चा रंगली आहे.

तालुक्यातील युवकांच्या पाचवीलाच संघर्ष

राजकीय दृष्टीने संवेदनशील मतदारसंघातील तरुणांच्या पाचवीलाच संघर्ष पुजलेला आहे. अगदी मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल, तर मतदार संघात एकही खासगी शिक्षण संस्था नाही. शेजारील तालुक्यात शिक्षण संस्थांचे, सहकारी संस्थांचे जाळे आहे. मतदारसंघातील तरुणांच्या पाचवीलाच संघर्ष पूजला आहे. तो संपवण्यासाठी रोहित यांनी पुढाकार घ्यावा अशीच तरुणांची अपेक्षा आहे.

Web Title: Constituency issues piled up in kavthe mahankal; Rohit Patil on state tour with rohit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.