देशात संविधान आणि मनुस्मृतीत संघर्ष -: बाबूराव गुरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:30 AM2019-06-11T00:30:38+5:302019-06-11T00:36:57+5:30
देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही.
सांगली : देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी सोमवारी व्यक्त केले.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सांगलीत ३० जूनला सत्कार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुस्तकांवर जिल्हाभरात चर्चा आयोजित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगलीतील संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम) यांच्यावतीने मराठा समाज भवनात ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ या पुस्तकावर प्रा. डॉ. गुरव यांनी विचार मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी. डी. लाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते.
प्रा. डॉ. गुरव म्हणाले की, मनुस्मृतीत स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारले आहे. त्यांना मानसिक गुलामगिरीत ढकलले होते. पुरुषप्रधान संस्कृती वाढविण्यास हीच संस्कृती कारणीभूत ठरली. समाजातील विशिष्ट वर्गच श्रेष्ठ व इतर शुद्र असा भेद निर्माण केला गेला. हा ग्रंथ बहुजन समाजाला टाचेखाली तुडविणारा आहे. त्यात अनेक खोट्या, काल्पनिक गोष्टी आहेत. या ग्रंथाशी मनूचा काहीच संबंध नाही. पाच हजार वर्षांपूर्वी मनूचा जन्म झाला होता. हा ग्रंथ दोन हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला. या संस्कृतीचा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनाही त्रास सहन करावा लागला. पण त्या साऱ्याला शिवाजी महाराज पुरून उरले.
विशिष्ट वर्गाची मक्तेदारी निर्माण करणाºया या मनुस्मृतीविरोधात महात्मा फुले यांनी पहिल्यांदा आवाज उठविला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून त्याचा निषेध केला होता. त्यामुळे देशात मनुस्मृतीचे नव्हे, तर भीमस्मृतीचे राज्य येऊ शकले.
संग्राम संस्थेच्या अध्यक्षा मीना शेषू प्रास्ताविकात म्हणाल्या की, समाजात जातीव्यवस्था घट्ट झाली आहे. त्यातून ‘सैराट’सारख्या घटना घडत असतात. त्यामागे मनुस्मृतीचा विचार आहे. हा विचार मोडून काढू.
समाजाची पिळवणूक करणारी ही संस्कृती असून, त्याविरोधात संघटितपणे उभे राहिले पाहिजे, असे मत टी. डी. लाड यांनी व्यक्त केले. सुलभा होवाळे यांनी आभार मानले. यावेळी संग्राम संस्थेच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
चळवळ सुरू व्हावी
दारिद्र्य, अज्ञान, विषमता, अंधश्रद्धा याचा फायदा उठवित आजही मनुस्मृतीतील धोरणे राबविण्याचा प्रयत्न केला जातो. त्याविरुध्द संघटितरित्या चळवळ सुरू केली पाहिजे, असे डॉ. गुरव म्हणाले.