सदाभाऊंच्या भाषणांवर येणार मर्यादा
By admin | Published: July 26, 2016 11:53 PM2016-07-26T23:53:54+5:302016-07-27T00:39:06+5:30
मंत्रीपदामुळे होणार अडचण : शासनावर टीका करणे होणार कठीण
प्रताप बडेकर -- कासेगाव--आक्रमक, रांगड्या व अस्सल गावरान भाषणाने सदाभाऊ खोत हे सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. भाजपने त्यांना घटकपक्षाच्या माध्यमातून मंत्री केल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आता मर्यादा पडणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘मुलुखमैदानी तोफ’ म्हणून उभ्या महाराष्ट्रात सदाभाऊ खोत प्रसिध्द आहेत. खा. राजू शेट्टी व सदाभाऊ या जोडीने पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरासाठी मोठमोठी आंदोलने केली आहेत. गेल्या १५ वर्षांत त्यांनी साखरसम्राटांना सळो की पळो करुन सोडले आहे. त्यांच्यामुळेच उसाला चांगला दर मिळाला, हे वास्तव आहे. या ऊसदर आंदोलनाच्या माध्यमातून सदाभाऊंचा सर्वसामान्य व शेतकऱ्यांशी ऋणानुबंध निर्माण झाला. आक्रमक, रांगड्या भाषणशैलीमुळे त्यांनी भल्या-भल्यांना जेरीस आणले. पाठीमागे कोणतीही मोठी शक्ती नसताना, केवळ भाषणचातुर्यावरच त्यांनी राष्ट्रवादीचे मोठे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना खासदारकीच्या निवडणुकीत झुंजविले होते. अगदी अल्पमतात सदाभाऊ पराभूत झाले होते. या लढतीची चर्चा राज्यभर झाली.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आमदार अजित पवार, आमदार जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, आ. हसन मुश्रीफ आदी राजकीय नेत्यांवरील टीकेमुळे सदाभाऊ खोत यांना प्रसिध्दी मिळाली. मात्र आता सदाभाऊ राज्यात मंत्री झाल्याने त्यांच्या भाषणातून बोलण्यावर निर्बंध येणार आहेत. ऊसदराबाबत ते कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
ऊस दराच्या भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील व सदाभाऊ खोत यांच्यामध्ये ऊस दरासाठी संघर्ष झाला आहे. एफआरपी, ऊस दरासाठी जयंत पाटील यांच्याविरोधात अनेक आंदोलने सदाभाऊंनी केली आहेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सदाभाऊ कृषिमंत्री झाले आहेत. त्यामुळे येथून पुढे ऊसदराच्या प्रश्नासाठी सदाभाऊ कोणती भूमिका घेणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे.