बांधकाम महागले; व्यावसायिक अडचणीत
By admin | Published: May 7, 2017 01:07 AM2017-05-07T01:07:19+5:302017-05-07T01:07:19+5:30
सिमेंट, वाळू दरवाढीचा परिणाम; प्रतिस्क्वेअर फूट दर दोनशेनी वाढला; सिमेंट दरवाढ रोखण्याची सरकारकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घरबांधणीचा कणा असलेली वाळू आणि सिमेंटच्या दरवाढीमुळे बांधकाम महागले आहे. या दरवाढीतून विविध गृहप्रकल्पांचे काम करताना बांधकाम व्यावसायिकांना कसरत करावी लागत आहे शिवाय बांधकामाचा दर प्रतिस्क्वेअर फुटाला सरासरी दोनशे रुपयांनी वाढला आहे.
बांधकामात स्टीलबरोबरच वाळू आणि सिमेंट हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सध्या वाळू उपसा बंद आहे. उपसा बंद असल्यामुळे मागणीच्या तुलनेत वाळूची उपलब्धता कमी असल्याने साधारणत: एक ट्रक वाळूच्या दरात सरासरी चार ते सहा हजार रुपयांची वाढ झाली. अडीच ब्रास वाळूच्या एक ट्रकसाठी आता २६ ते २८ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सिमेंट कंपन्यांनी ५० किलो सिमेंटच्या पोत्यामागे सरासरी ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे २४२ रुपयांना मिळणाऱ्या एका पोत्याचा दर ३०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचा परिणाम रेडिमेड काँक्रिटच्या दरवाढीवरदेखील झाला आहे. कोल्हापुरात सध्या विविध ठिकाणच्या ७५ प्रकल्पांमध्ये दीड ते दोन हजार फ्लॅटचे बांधकाम सुरू आहे. वाळू, सिमेंट महागले असल्याने बांधकामाच्या दरात सरासरी दोनशे रुपये स्क्वेअर फूट इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पांतील काम पूर्ण करताना कसरत करावी लागत आहे. ही दरवाढ परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना ‘खो’ घालणारी आहे. वाळू आणि सिमेंटची दरवाढ कमी करण्याबाबत सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलणे गरजेचे असल्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांतून होत आहे.
वाळू आणि सिमेंटची दरवाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पांचे काम पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली आहे. वाळूसाठी दुसरा पर्याय आम्हाला उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच देणार आहोत. सिमेंटचे दर कमी करण्याबाबत ‘क्रिडाई’ चे केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
- महेश यादव, अध्यक्ष,
क्रिडाई कोल्हापूर.
वाळू, सिमेंटच्या दरांमध्ये झालेली वाढ बांधकाम व्यवसायाला मारक ठरणारी आहे. ही दरवाढ कमी करण्याबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा. वाळू, सिमेंटच्या दरांवर सरकारने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
-संजय शिंदे,
बांधकाम व्यावसायिक
वाळूचा वापर कमी करण्याचा पर्याय
वाळूची दरवाढ आणि तिचा कमी असलेला पुरवठा अशा स्थितीत बांधकामासाठी वाळूचा वापर कमी करण्याचा पर्याय बांधकाम व्यावसायिकांनी स्वीकारला आहे. अनेक व्यावसायिकांनी वाळूचा वापर २५ टक्क्यांपर्यंत आणला आहे. ‘एएसी ब्लॉक’ हे केमिकलद्वारे जोडून त्यावर बाहेरून जिप्सम लावून बांधकाम केले जात आहे. सिमेंटसाठी असा दुसरा सशक्त पर्याय उपलब्ध नाही.
राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यात वाळू उपसा बंद आहे. त्यामुळे उपलब्ध असणाऱ्या वाळूच्या दरात चार ते सहा हजार रुपये प्रति ट्रक अशी वाढ झाली आहे. उपसा बंद असल्याने वाळू वाहतुकीवर अवलंबून असणारे ५०० ट्रकचालक, सुमारे ६०० हमाल व अन्य कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा रोजगाराचा प्रश्न आणि बांधकाम क्षेत्राची गरज लक्षात घेऊन वाळू उपशासाठी पूर्वीप्रमाणे परवानगी द्यावी.
- सुभाष जाधव, अध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशन.
सुमारे ६५ हजार टन सिमेंट
१ जिल्ह्यात १३ हून अधिक कंपन्यांचे सिमेंट उपलब्ध आहे. ४३ ग्रेड, ५३ ग्रेड, पी.पी.सी. व पी.एस.सी. आदी चार ग्रेडचे सिमेंट येते.
२ काँक्रीट, बांधकाम व गिलावा आदींसाठी सिमेंटचा वापर होतो. महिन्याला सुमारे ६५ हजार मेट्रीक टन इतके सिमेंट कोल्हापूर जिल्ह्याला लागते.
३ कच्चा माल, वाहतूक आदींच्या दरात वाढ झाल्याने सिमेंटची किंमत वाढविण्यात आली असल्याचे एका कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.