चिंचोली येथे रस्त्यातून गटाराचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:43+5:302021-03-06T04:25:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा/कोकरुड : चिंचोली (ता. शिराळा) येथील बसस्थानकाजवळील फरशी पुलाच्या भिंतीच्या आतून रस्त्यातूनच गटाराचे बांधकाम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा/कोकरुड : चिंचोली (ता. शिराळा) येथील बसस्थानकाजवळील फरशी पुलाच्या भिंतीच्या आतून रस्त्यातूनच गटाराचे बांधकाम करण्याचा अजब प्रकार ठेकेदाराने सुरू केला आहे. याबाबत संबंधित अभियंत्याला ग्रामस्थांनी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने काम त्वरित थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
चिंचोली बसस्थानकाजवळ रस्त्याला तीव्र वळण असून येथील फरशी पुलाची रुंदी फक्त १५ मीटर ठेवल्याने अगोदरच तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. त्यात आता आणखी गटाराचेही यातच बांधकाम सुरू करून या ठेकेदाराने ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कराड ते रत्नागिरी हा जवळचा मार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. याशिवाय अवजड वाहतूक लांब पल्ल्यांच्या गाड्या, ऊस हंगामात डबल ट्रॅाल्यांची वाहतूक, ग्रामस्थांची रहदारी यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यातच हे अपघाती वळण असल्याने येथे पुलाची रुंदी १८ मीटर केली जावी अशी मागणी आहे. त्यामुळे ठेकेदाराने येथील नियमबाह्य कामे थांबवावीत अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.