इमारतीवरून पडून बांधकाम मजूर ठार
By admin | Published: April 5, 2017 11:51 PM2017-04-05T23:51:27+5:302017-04-05T23:51:27+5:30
इमारतीवरून पडून बांधकाम मजूर ठार
सांगली : येथील सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याजवळील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान दुरुस्तीच्या कामावेळी इमारतीवरून पडून बांधकाम मजूर ठार झाल्याची घटना बुधवारी घडली. रमजान मुख्तार शेख (वय ३८, रा. गादी कारखान्यामागे, शामरावनगर) असे मृताचे नाव आहे.
सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यालगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. वसंतदादा शासकीय रुग्णालयासह विविध शासकीय कर्मचारी या इमारतीत राहतात. ही इमारत जुनी झाल्याने तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. आठ दिवसांपासून इमारत दुरुस्तीचे काम सुरू होते. पहिल्या मजल्यावरील स्लॅब फोडण्यात आला होता. बुधवारी दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब फोडण्याचे काम सुरू होते.
रमजान शेख बे्रकरच्या साहाय्याने स्लॅब फोडण्याचे काम करीत होता. दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक छपरी कोसळली. त्यासोबत रमजान हाही दुसऱ्या मजल्यावरून जमिनीवर पडला. त्याच्या अंगावर, डोक्यावर स्लॅब पडला. कामावरील इतर मजूर व नागरिकांनी छपरीचा मोठा तुकडा बाजूला काढून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले; पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच शामरावनगर परिसरातील नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. रात्री शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)