बांधकाम कामगारांचा सांगलीमध्ये मोर्चा
By admin | Published: October 31, 2014 11:48 PM2014-10-31T23:48:37+5:302014-10-31T23:51:22+5:30
विविध मागण्या : न्यायालयात दाद मागणार
सांगली : बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते शंकर पुजारी यांनी केले.
बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित असून, ते निकाली काढण्यात यावेत, मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी, घर बांधणीसाठी दोन ते पाच लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळावे, घर बांधणीसाठी अल्पदराने जमिनी मिळाव्यात, ६० वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम कामगारांना अंत्योदय रेशन कार्डे मिळावीत, दोन रुपये दराने ३५ किलो धान्य मिळावे आदी मागण्यांसाठी आजचा मोर्चा काढण्यात आला होता.
या मागण्या कायदेशीर असून याबाबत वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने सूचनाही केल्या आहेत. या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. मोर्चा शिवाजी मंडई, महापालिका, राजवाडा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. आंदोलनामध्ये सुमन पुजारी, विजय बचाटे, वर्षा गडचे, कमल तांदळे, बाळू दिवाणजी, आनंद तांदळे, अर्जुन पखाली, बाळासाहेब कोल्हे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)