सुपर सेल देणाऱ्या बझारचा झाला ‘बाजार’; ऑनलाइन डिलिव्हरीची साखळी तुटली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 03:51 PM2022-06-04T15:51:32+5:302022-06-04T15:53:49+5:30
व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत ग्राहकांचा राग अनावर झाला. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच अनेक ग्राहकांनी प्रतिक्रिया व तक्रारींचा पाऊस पाडला.
सांगली : ऑनलाइन ऑर्डर्स घेणाऱ्या सांगलीजवळच्या बझारकडे मालासाठी आगाऊ बुकिंग केलेल्या ग्राहकांत फसवणुकीची भावना आहे. ठरलेल्या वेळेत माल घरपोहोच मिळत नसल्याने गुंतविलेले पैसे पणाला लागले आहेत. १ मेपासून एकाही ग्राहकाची ऑर्डर बझारने घेतलेली नाही.
व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत ग्राहकांचा राग अनावर झाला. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच अनेक ग्राहकांनी प्रतिक्रिया व तक्रारींचा पाऊस पाडला. ऑनलाइन ॲपद्वारे बुकिंगनंतर बाजारभावापेक्षा स्वस्तात माल घरपोहोच देण्याची योजना बझारने जाहीर केली होती. ग्राहकांनी प्ले स्टोअरवरून २९ हजार वेळा ॲप डाऊनलोड केले आहे. त्यावरून ग्राहकांच्या ऑर्डर्स एप्रिलअखेरपर्यंत घेण्यात आल्या. १ मेपासून बंद करण्यात आल्या.
बझारचा ग्राहकांशी संपर्क तुटल्याने आणीबाणीची स्थिती उद्भवली. सध्या तो कुलूपबंद आहे. कॉल सेंटरवर संपर्क होत नाही. काही ग्राहकांनी व्यवस्थापनाच्या मोबाइलवरही संपर्क केला; पण संवाद होत नसल्याने अस्वस्थता, घबराट आणि फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. एप्रिलमध्ये बझारबाहेर माहिती देण्यासाठी काही कर्मचारी नेमण्यात आले; पण त्यांच्यावर हल्ले करण्यापर्यंत ग्राहकांचा राग अनावर झाला. रमजान ईदच्या काळात मिरजेतून खूपच मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स थेट बझारमध्ये आल्या, त्या पूर्ण करताना ऑनलाइन डिलिव्हरीचा मात्र फज्जा उडाला.
खूपच स्वस्तात माल मिळू लागल्याने काही किराणा दुकानदारांनीही वेगवेगळ्या नावांनी ऑर्डर्स नोंदविल्या, त्यामुळेही डिलिव्हरीची यंत्रणा कोलमडली. ॲपवरून मागणी नोंदविलेल्या ग्राहकांना माल निर्धारित वेळेत मिळालाच नाही. ग्राहकांच्या प्रचंड मागणीला तोंड देण्याइतपत बझारची तयारी नसल्याने सगळाच बाजार झाला.
यासंदर्भात व्यवस्थापनाने दावा केला की, सद्य:स्थितीला फक्त ३५० ग्राहकांच्या १ हजार १०० ऑर्डर्स घरपोहोच देणे बाकी आहे. ग्राहकांशी संवाद तुटल्याने ही स्थिती निर्माण झाली. बझारच्या सर्व व्यवहारांची माहिती आम्ही स्वत:च संजयनगर पोलिसांत दिली आहे. कोणाचीही फसवणूक केली जाणार नाही. बझार पुुन्हा सुरू केला जाईल.
सगळाच अनागोंदी कारभार
बझारचा खूपच मोठा गाजावाजा झाल्याने ग्राहकांचा प्रचंड ताण बझारवर आला, तो पेलण्याइतपत तयारी व्यवस्थापनाने केली नव्हती. मेल व कॉल सेंटरवरून प्रतिसाद, मागणीनुसार वेळेत पुरवठा, बझारच्या जागेचा विस्तार, ग्राहकांशी संवाद या सर्वच बाबतीत अनागोंदीची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.