सांगली जिल्ह्यातील संघांच्या पिशवीबंद दुधाचा खप निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:18 AM2020-06-01T11:18:46+5:302020-06-01T11:21:59+5:30
शिराळा तालुक्यातील प्रचिती दूध संघाचे गाय दुधाचे ८००० लिटर, तर म्हैस दुधाचे २४ हजार लिटरचे संकलन होते. दोन महिन्यात या संघाला २ कोटी ७५ लाख रुपयांचा तोटा सोसावा लागला आहे.
जितेंद्र येवले
इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी दूध संघांना यावर्षी कोरोना संसर्गामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. मार्चपासून कोरोनाचे सावट, हॉटेल्स, मिठाईची दुकाने बंद, मेच्या मध्यंतरात झालेले परप्रांतीयांचे आऊटगोर्इंग यामुळे तीन महिन्यात पिशवीबंद दुधाची विक्री निम्म्याने कमी झाली आहे.
जिल्ह्यात वसंतदादा, राजारामबापू, शेतकरी, सोनहिरा, प्रचिती, हुतात्मा या सहकारी संघांसह १७ मल्टिस्टेट, तर १४ खासगी दूध संघ आहेत. या दूध संघांचे बहुतांशी पिशवीबंद दूध पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत वितरित होते. मुंबई आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत
त्यामुळे दुधाची मागणी असूनही तेथे पुरवठा करता येऊ शकला नाही. परप्रांतीय तसेच नोकरीनिमित्त मुंबई, पुण्यातून गावी परतण्यासाठी इच्छुक असलेल्यांना शासनाने सशर्त परवानगी दिली. या आऊटगोर्इंगमुळेही पिशवीबंद दूध मागणीघटली.
राजारामबापू दूध संघाचे गाय आणि म्हैस असे मिळून जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख लिटर दुधाचे संकलन होते. मुंबई, पुणे व कोकणात सव्वा लाख लिटर पिशवीबंद दुधाची विक्री होत होती. तीन महिन्यात ही मागणी ४५ हजार लिटरवर गेल्याचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी स्पष्ट केले.
शिराळा तालुक्यातील प्रचिती दूध संघाचे गाय दुधाचे ८००० लिटर, तर म्हैस दुधाचे २४ हजार लिटरचे संकलन होते. दोन महिन्यात या संघाला २ कोटी ७५ लाख रुपयांचा तोटा सोसावा लागला आहे. यशवंत दूध संघात गाय दुधाचे ७००० लिटर आणि म्हैस दुधाचे ३० हजार लिटर संकलन होते. दोन महिन्यात ३ कोटी ३२ लाख रुपयांचा तोटा सोसावा लागल्याचे येथील व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
दूध विक्रीमध्ये ४0 टक्के फरक पडला आहे. थोटे डेअरीमार्फत सॅनिटायझिंग करून दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांर्पंत पोहोचवत आहोत. लॉकडाऊन शिथिल झाल्याने आता दुधासह इतर उत्पादनांच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.
- शीतल थोटे, संचालक, जे. डी थोटे डेअरीज् आष्टा.
पुणे, मुंबईतील पिशवीबंद दुधाच्या वितरणावर परिणाम झाला आहे. हॉटेल्स, स्वीट मार्ट, चहागाडे बंद आहेत. घरगुती दूध विक्री३0 टक्क्यावर आली आहे. दैनंदिन ७0 हजार लिटर संकलन होते. सध्या २0 हजार लिटर दुधाचीच विक्री होत आहे. ५0 हजार लिटर दुधापासून पावडर व बटर बनविले जात आहे. परंतु त्यालाही मागणी नसल्याने दूध खरेदीत लिटरमागे ९ ते १0 रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
- गौरव नायकवडी, अध्यक्ष, हुतात्मा दूध संघ वाळवा.