उज्ज्वल निकम यांच्याशी गृहराज्यमंत्र्यांकडून संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:35 PM2017-11-19T23:35:21+5:302017-11-19T23:41:14+5:30
सांगली : अनिकेत कोथळे खून-खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. पण अजूनही शासनाने निकम यांच्याकडे याबाबत कोणतीही विचारणा केलेली नाही. त्यामुळे निकम यांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश निघालेला नाही.
सांगली शहर पोलिसांनी ५ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळेला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी ‘थर्ड डिग्री’चा वापर करुन त्याला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील जंगलात जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजणांना अटक केली आहे. या घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. पोलिस ठाण्यासमोर आंदोलने झाली. सांगलीकरांनी या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. अनिकेतच्या नातेवाईकांनीही निकम यांच्या नियुक्तीचा आग्रह धरला आहे.
गहराज्यमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री सुभाष देशमुख, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे नेते बाळा नांदगावकर या नेत्यांनी मृत अनिकेतच्या घरी भेट देऊन त्याच्या कुटुंबाचे सांत्वन केले. या खटल्यात अॅड. निकम यांची नियुक्ती करण्यासाठी पाठपुरावा करु, असेही या नेत्यांनी सांगितले होते. मात्र अजूनही निकम यांची नियुक्ती करण्यासाठी शासनाने त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. कोथळे कुटुंबीयही सातत्याने निकम यांच्या नियुक्तीची मागणी करीत आहेत. पण प्रत्यक्षात शासकीय स्तरावर अजून तरी त्याबाबत कोणत्याच हालचाली नाहीत.
चौथा खटला ठरणार
अॅड. निकम यांचे सांगलीशी जुने नाते आहे. १९९८ मध्ये सांगलीत अमृता देशपांडे या महाविद्यालयीन तरुणीचा खून झाला होता. या खून-खटल्याचे काम निकम यांनी पाहिले होते. तसेच २००४ मध्ये झालेल्या मिरजेतील रितेश देवताळे या शाळकरी मुलाच्या खून-खटल्याचे कामही त्यांनीच पाहिले होते. या दोन्ही खटल्यात आरोपींना जन्मठेप झाली होती. सध्या निकम यांच्याकडे सांगली जिल्ह्यातील पळशी (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खुनाचा खटला आहे. आता अनिकेत कोथळे प्रकरणात त्यांची नियुक्ती झाल्यास त्यांचा जिल्ह्यातील हा चौथा खटला असेल.
अनिकेत कोथळेचा पोलिसांनी कोठडीत खून करुन त्याचा मृतदेह जाळल्याची घटना समजली आहे. सध्या मी कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व तिच्या खुनाच्या खटल्याचे काम पाहत आहे. कोपर्डी येथे शनिवारी शासकीय विश्रामगृहात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी भेट झाली. त्यांनी अनिकेत कोथळे प्रकरणाची माहिती दिली. सांगालीकरांनी हा खून-खटला तुम्ही चालवावा, अशी इच्छा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. पण शासनस्तरावरुन अजूनही अधिकृत कोणताही आदेश निघालेला नाही. - उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील