खासगी प्रकाशनाचे साहित्य रोखले
By Admin | Published: June 28, 2016 11:28 PM2016-06-28T23:28:22+5:302016-06-28T23:35:01+5:30
इस्लामपुरात हजारावर पुस्तके जप्त : शालेय साहित्य विक्रेता संघटनेची कारवाई
इस्लामपूर : शाळा व महाविद्यालयांतून पालक आणि विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या खासगी दुकानदारीला चाप लावण्यासाठी स्वत:च मैदानात उतरलेल्या शालेय शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनी मंगळवारी इस्लामपूर व नेर्ले येथे शासनाची मान्यता नसताना खासगी प्रकाशनाच्या साहित्याची विक्री करणाऱ्यांकडून विविध विषयांची एक हजारावरपुस्तके जप्त केली. ती शिक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आली.
शाळा, महाविद्यालयांतून खासगी प्रकाशनाच्या साहित्याची विक्री करू नये, असा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने २००४ मध्ये काढला आहे. मात्र या अध्यादेशाला न जुमानता काही शाळा व महाविद्यालयांतून संस्थाचालक, शिक्षकांच्या संगनमताने शासनाची मान्यता नसणाऱ्या खासगी प्रकाशनांचे साहित्य विद्यार्थ्यांच्या माथी मारले जात होते. शिवाय शालेय साहित्य विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसत होता.
शालेय साहित्य विक्रेता संघटनेचे राज्य संघटक मोहन पाटील यांनी सहकाऱ्यांसह आक्रमक भूमिका घेत मंगळवारी इस्लामपूर व नेर्ले येथील शाळांमधून सुरु असलेली खासगी प्रकाशनाच्या साहित्याची विक्री रोखून धरली. हे साहित्य विक्री करण्यासाठी आलेल्या एजंटांना त्यांच्या वाहनांसह ताब्यात घेऊन पंचायत समिती कार्यालयात आणले. तेथे त्यांच्याकडील सर्व शालेय साहित्य, त्याच्या पावत्या जप्त करण्यात आल्या. यामध्ये इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र पुस्तकांचा समावेश होता.
पुस्तक विक्रेत्यांच्या या कारवाईने खळबळ उडाली होती. या कारवाईत शहराध्यक्ष उमेश कुरळपकर, जगोध्दार पाटील, सचिन माने, सुजित पाटील, मनोज जैन, दीपक जाधव यांनी भाग घेतला. (वार्ताहर)
वाळवा तालुक्यातील शाळा, संस्थाचालकांनी शासनाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. शालेय साहित्य विक्रेत्यांनी ज्या शाळांमधून हे खासगी प्रकाशनाचे साहित्य जप्त केले, त्या शाळांना नोटीस बजावणार आहोत. त्यांचा लेखी खुलासा वरिष्ठांकडे पाठवून कारवाईबाबत मार्गदर्शन घेऊ. शाळेची मान्यता रद्द करणे, अनुदान रोखणे, जादा तुकडीला मान्यता न देणे अशी कारवाई होऊ शकते. यापुढील काळात शाळांनी असे साहित्य खरेदी-विक्री करू नये. अन्यथा कारवाई अटळ असेल.
- मोहन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी,
वाळवा पंचायत समिती
खासगी प्रकाशनाचे साहित्य खरेदी करुन ते विद्यार्थ्यांच्या माथी मारू नका. आज शालेय साहित्य विक्रेता संघटनेने हे प्रकार रोखण्याची सुरुवात केली आहे. यापुढे अशी विक्री करू देणार नाही. खासगी प्रकाशनांसह शाळांविरुध्द स्वतंत्रपणे कारवाईसाठी पाठपुरावा करू.
- मोहन पाटील, राज्य संघटक, शालेय साहित्य विक्रेता संघटना.
वाळवा तालुक्यामधील शाळा, महाविद्यालयांतून शासनाच्या परवानगीशिवाय अशी खासगी प्रकाशनाच्या साहित्याची विक्री करुन विद्यार्थ्यांना लुबाडले जात असल्यास, त्यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करावेत. शिक्षण विभागाने कठोर पावले उचलावीत. तालुक्यात असे प्रकार खपवून घेणार नाही.
- नंदकुमार पाटील, पं. स. सदस्य, येडेनिपाणी.