पावसात दूषित पाणी ठरेल जीवघेणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:31 AM2021-09-09T04:31:52+5:302021-09-09T04:31:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे रोगराई बळावत आहे. त्यामुळे पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे रोगराई बळावत आहे. त्यामुळे पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मेडिक्लोअरसारख्या अैाषधांच्या वापराद्वारेही पाण्याचे शुद्धीकरण करता येईल.
पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होतात. शुद्धीकरण प्रकल्पात पाण्याचे शंभर टक्के निर्जंतुकीकरण होत नाही. गटारे ओव्हरफ्लो झाल्याने सांडपाणी थेट नदीत मिसळते. सांगली शहराचा विचार करता, शेरीनाला पावसाळ्यात नेहमीच कृष्णेत मिसळत असतो. या स्थितीत पाण्याची जोखीम वाढते. दूषित पाण्याने विविध पोटविकारांना आमंत्रण मिळते. गॅस्ट्रोसारख्या साथी फैलावतात.
बॉक्स
गॅस्ट्रो, डायरीया आणि विषमज्वर
- दूषित पाणी पिण्याने प्रामुख्याने पोटविकार बळावतात.
- हगवण, गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर हे पावसाळ्यात उदभवणारे सार्वत्रिक आजार आहेत.
- वाताच्या विकारासोबतच सर्दी, पडसे, खोकला हेदेखील आजार सुरू होतात.
- सध्याच्या कोरोना साथीच्या काळात तर सर्दी-पडसे फारच जोखमीचे ठरते.
- दूषित पाणी पोटात जाण्याने काविळीची बाधा होते, लेप्टोस्पायरोसीसही फैलावतो.
बॉक्स
आजाराची लक्षणे
- जुलाब, उलट्या, ताप ही दूषित पाण्याच्या बाधेची काही लक्षणे आहेत.
- पोटात मळमळून सतत स्वच्छतागृहात धाव घ्यावी लागते.
- उलटी व जुलाबाने शरीर कोरडे पडते, म्हणजेच गॅस्ट्रो उदभवतो.
- दिवसभरात अनेकदा पातळ, पाण्यासारखे शौचाला होते.
- जीभ व तोंड कोरडे पडते, डोळे खोल जातात. लघवीचा रंग बदलतो.
बॉक्स
हे करा उपाय
पावसाळ्यात उकळून थंड केलेले पाणी प्या, दहा लिटर पाण्यात एक थेंब मेडिक्लोअरचा वापर करा, पाणी जास्त दिवस साठवून वापरू नका, बाहेरचे पाणी टाळा.
बॉक्स
सांगलीकरांच्या नशिबी बारमाही शेरीनाला
शुध्द पाण्यासाठी धडपडणाऱ्या सांगलीकरांच्या नशिबी शेरीनाला बारमाहीच आहे. पावसाळ्यात तर कृष्णेची गटारगंगाच होते. महापालिकेची शुद्धीकरण यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असली, तरी पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येते. त्यामुळे नागरिकांनी घरोघरी प्युरिफायर बसवले आहेत. यामुळे शहरात फिल्टर प्लॅन्टसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कॅनद्वारे पाणी पुरविण्याचा धंदाही फोफावला आहे, पण त्याच्या शुद्धतेवरही कोणाचेच नियंत्रण नाही.