कोविड रुग्णालयातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 11:22 AM2021-08-03T11:22:46+5:302021-08-03T11:25:32+5:30
CoronaVirus Sangli : कोविड काळात वैद्यकीय सेवेसाठी कंत्राटी स्वरुपात घेतलेल्या ४०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने ३१ जुलैपासून कार्यमुक्त केले. यामुळे कोविड रुग्णालयांत मनुष्यबळाची चणचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी कार्यमुक्तीचे आदेश काढले.
संतोष भिसे
सांगली : कोविड काळात वैद्यकीय सेवेसाठी कंत्राटी स्वरुपात घेतलेल्या ४०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने ३१ जुलैपासून कार्यमुक्त केले. यामुळे कोविड रुग्णालयांत मनुष्यबळाची चणचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी कार्यमुक्तीचे आदेश काढले.
कार्यमुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, पुरुष व स्त्री परिचारिका, फिजीशियन, दंत चिकित्सक, आरोग्यसेविका, एक्सरे व इसीजी तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदींचा समावेश आहे. कोविड काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत त्यांना टप्प्याटप्प्याने नियुक्त्या दिल्या होत्या. पहिली लाट संपताच कार्यमुक्त केले होते.
दुसरी लाट सुरु होताच एप्रिलमध्ये पुन्हा नियुक्त केले गेले. लाट कमी होण्याच्या अंदाजाने त्यांच्या नियुक्त्या जूनपर्यंतच मर्यादीत होत्या. ३० जूनरोजी सर्व लस टोचकांची सेवा समाप्त करण्यात आली. रुग्णसंख्या वाढती राहिल्याने अन्य कर्मचाऱ्यांना ३१ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. या सर्वांना शनिवारी कार्यमुक्त करण्यात आले.
जिल्हाभरातील शासकीय कोविड रुग्णालयांत अजूनही मोठ्या संख्येने रुग्ण आहेत. कर्मचारी कपातीमुळे तेथे मनुष्यबळाची चणचण निर्माण होणार आहे. समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अद्याप कायम असल्या तरी त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी कर्मचारी नाहीत असे चित्र आहे. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात येईल असे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले आहे, पण त्याची कोणतीही हमी नसल्याने कर्मचारी अस्वस्थ आहेत.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली नाही तरी, आम्हाला कार्यमुक्तीचे आदेश मिळाले आहेत. कोरोनाच्या दोन लाटांमध्ये आम्ही सक्षमपणे काम केले आहे. हे लक्षात घेऊन शासनाने पुन्हा नियुक्त्या दिल्या पाहिजेत. यामुळे सुशिक्षत तरुणांना रोजगार मिळेल, शिवाय रुग्णसेवेसाठी पुरेसे मनुष्यबळदेखील उपलब्ध होईल.
- रवींद्र कांबळे,
कंत्राटी परिचारिक
कोविड सेवेसाठी कंत्राटी स्वरुपात घेतलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनुसार झाली आहे. राज्यभरातच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. यामुळे कोविड रुग्णालयांत मनुष्यबळाची समस्या निर्माण होणार असल्याकडे आम्ही शासनाचे लक्ष वेधले आहे. सोमवारी याविषयी प्रधान सचिवांशी वरिष्ठांची चर्चाही झाली. एक-दोन दिवसांत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.
- डॉ. मिलींद पोेरे,
जिल्हा आरोग्याधिकारी