कंत्राटदार माणिकराव पाटील खूनप्रकरण: बॅग, मोबाइल नदीत फेकला; संशयित पोलीस कोठडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 12:44 PM2022-08-31T12:44:54+5:302022-08-31T12:45:21+5:30
माणिकराव पाटील यांना प्लॉट बघण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी तुंग येथे बोलवून अपहरण करण्यात आले होते. यानंतर १७ रोजी त्यांचा मृतदेह कवठेपिरान येथे वारणा नदीपात्रात आढळून आला होता.
सांगली : कंत्राटदार माणिकराव पाटील यांच्या खूनप्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन घटनाक्रमाचा उलगडा केला. संशयितांनी पाटील यांचे हात बांधून नदीत फेकले. त्यांची बॅग व मोबाइलही पाण्यात फेकल्याची कबुली दिली. या खूनप्रकरणी संशयित किरण लखन रणदिवे (वय २६), अनिकेत ऊर्फ नीलेश श्रेणिक दुधारकर (वय २२) आणि अभिजित चंद्रकांत कणसे (वय २०) हे सध्या पोलीस कोठडीत आहेत.
अपहरण केलेल्या ठिकाणापासून ते कुंभोज पुलावरून माणिकराव पाटील यांना नदीत फेकले. येथेच पाटील यांचा मोबाइल आणि बॅग पाण्यात फेकल्याचे त्यांनी सांगितले. त्याच मार्गावरून पुढे कोंडिग्रे फाटा येथे माेटार सोडल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तेथून हातकणंगले, आष्टामार्गे ते कारंदवाडीला दुचाकीवरून परतल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली आहे.
माणिकराव पाटील यांना प्लॉट बघण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी तुंग येथे बोलवून अपहरण करण्यात आले होते. यानंतर १७ रोजी त्यांचा मृतदेह कवठेपिरान येथे वारणा नदीपात्रात आढळून आला होता. या खुनात कारंदवाडी येथील तिघांना अटक करण्यात आली.