‘वसंतदादा’च्या कामगारांचा दत्त इंडियाशी करार

By admin | Published: June 30, 2017 11:13 PM2017-06-30T23:13:25+5:302017-06-30T23:13:25+5:30

‘वसंतदादा’च्या कामगारांचा दत्त इंडियाशी करार

Contractor of 'Vasantdada' workers Dutt India | ‘वसंतदादा’च्या कामगारांचा दत्त इंडियाशी करार

‘वसंतदादा’च्या कामगारांचा दत्त इंडियाशी करार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वसंतदादा साखर कारखान्याच्या कामगारांना तात्काळ ३० टक्के पगार देण्याचा निर्णय दत्त इंडिया कंपनीने घेतला. उर्वरित थकित पगार पाच टप्प्यात १४ टक्क्यांप्रमाणे दिला जाईल. त्याबाबतचा करार कारखाना चालवण्यास घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीने कामगार संघटनेशी शुक्रवारी केला. कंपनीने कामगार हिताचा विचार करीत रोजी-रोटी वाचवली आहे. कामगारांबाबत ऐतिहासिक करार झाल्याची माहिती साखर कामगार संघटनेचे जनरल सचिव प्रदीप शिंदे यांनी दिली.
वसंतदादा कारखान्याच्या कामगारांचा दत्त इंडिया कंपनीशी करार अखेर पूर्ण झाला. कंपनीचे संचालक धारू, सरव्यवस्थापक मृत्युंजय शिंदे, सचिव मोरे, कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष अमित पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष अशोक साळुंखे, महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळाचे राऊ पाटील, तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला.
जिल्हा बँकेने ९३ कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टखाली वसंतदादा साखर कारखाना ताब्यात घेतला होता. त्यानंतर हा कारखाना भाडेतत्त्वाने चालविण्यास देण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. कारखाना मुंबईच्या दत्त इंडिया या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. प्रतिटनास २६१ रुपये उच्चांकी दराने त्यांनी हा कारखाना घेतला आहे. निर्णय झाल्यानंतर जिल्हा बॅँकेचे प्राधिकृत अधिकारी मानसिंग पाटील यांनी करारपत्रक करण्यापूर्वी कारखाना सभासदांचा ठराव लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी विशेष सभा घेऊन ठरावही दाखल केला आहे. करारपत्रात कामगार, शेतकरी, सभासद व अन्य देणी तसेच कामगारांशी करायच्या कराराचाही उल्लेख बँकेने केला आहे. त्यामुळे कंपनी प्रतिनिधींनी गुरुवारपासून तातडीची बैठक घेऊन कामगार युनियनला चर्चेसाठी बोलावले होते. दत्त इंडियाने कामगारांशीही चर्चा करून स्वतंत्र करारावर शिक्कामोर्तब केले.
कारखान्यातील कामगारांना तात्काळ ३० टक्के पगार देण्याचा निर्णय कंपनीने घेतला. उर्वरित थकित पगार पाच टप्प्यात १४ टक्क्यांप्रमाणे दिला जाईल. त्याबाबतचा करार कंपनीने कामगार संघटनेशी केला. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत. भविष्य निर्वाह निधीचे १४ कोटी भरायचे आहेत. ही रक्कम व्याजासह ३४ कोटींवर गेली आहे. मार्चपर्यंत मुदलाची रक्कम भरण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
कंपनीने गुरुवारी दिवसभर कामगारांशी कराराबाबत चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चर्चेतून निर्णय झाला नाही. शुक्रवारी कराराबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. गेल्या अनेक दिवसांपासून कामगारांनी बैठका घेऊन युनियनच्या माध्यमातून कंपनी व कारखान्याला नियम पाळण्याबाबत इशारा दिला होता. त्यानुसार कंपनीने कामगारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. अनेक मुद्द्यांवर वादही झाला. भविष्य निर्वाह निधी रक्कम, तसेच कामगारांच्या थकीत फंडाच्या रकमेवरूनही वाद आहे. फंडाची रक्कम केवळ मुद्दल भरायची की व्याजासह, यावर बराच वेळ वाद झाला. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. तूर्त मार्चअखेर फंडाची सर्व रक्कम भरण्याचा निर्णय झाला. व्याजाबाबत चर्चा करू, व्याजात सवलत मिळते का, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कंपनीच्या प्रस्तावावर कामगार युनियनने समाधान व्यक्त केले आहे.
या बैठकीस चंद्रकांत सावंत, सर्जेराव भोसले, शिवाजी पाटील, पोपट पाटील, सुनील घोरपडे, संजय पवार, रामभाऊ पाटील, अरुण संकपाळ, राजू मुलाणी, श्रीकांत पाटील उपस्थित होते.
७३४ कामगार
वसंतदादा साखर कारखान्याकडे आहेत.
यापैकी ६०० कामगारांनाच घेण्यास दत्त इंडियाने करारामध्ये मंजुरी दिली आहे.
या कामगारांच्या पगाराचाही प्रश्न निर्माण होणार आहे. परंतु, कंपनीच्या माहितीनुसार जिल्हा बँकेला भाड्याद्वारे मिळणाऱ्या रकमेतून कारखान्याने १३४ कामगारांचा पगार भागवावा, असे ठरले.
दत्त इंडियाशी असा झाला करार
नऊ महिन्यांच्या थकित पगारापैकी तात्काळ ३० टक्के रक्कम देण्यास कंपनी तयार
उर्वरित पगार १४ टक्क्याने पाच टप्प्यात
सेवानिवृत्त कामगारांचे पैसे टप्प्याटप्प्याने देण्याचे मान्य
भविष्य निर्वाह निधीचे १४ कोटी भरणार
ग्रॅच्युईटीबाबत सकारात्मक चर्चा
कारखान्यातील कामगारांना सरासरी दोन ते सव्वादोन लाख रुपये मिळणार

Web Title: Contractor of 'Vasantdada' workers Dutt India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.