म्हमद्या बनला होता ठेकेदार
By admin | Published: December 11, 2015 12:12 AM2015-12-11T00:12:16+5:302015-12-11T01:06:24+5:30
बेडकीहाळला वास्तव्य : खोटे सांगून खोली घेतली
सांगली : संजयनगर येथील मनोज माने खून प्रकरणातील संशयित गुंड म्हमद्या नदाफ याने बेडकीहाळ येथे ठेकेदार असल्याचे भासवून खोली भाड्याने घेतली होती. त्यासाठी त्याला इचलकरंजीच्या एका मित्राने मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून म्हमद्या फरार होता. या तीन महिन्यांत तो कोठे होता? याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. मनोज माने या त्याच्या साथीदाराने फोंडेमार्फत म्हमद्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर म्हमद्या गायब झाला. त्यानंतर त्याने महिन्याभरापूर्वी मनोजचा खून केला. याप्रकरणी चारजणांसह त्याच्या दहा हितचिंतकांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यात आणखी आठ ते दहाजणांची वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील सर्वांना सहआरोपी व्हावे लागणार आहे. या तीन महिन्यांच्या कालावधित म्हमद्या कोठे कोठे राहिला, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या म्हमद्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे करीत आहेत.
म्हमद्याकडून सध्या त्याच्या वास्तव्याची माहिती घेतली जात आहे. त्या माहितीआधारे हा तपास सुरू असून, त्या माहितीची शहानिशाही केली जात आहे. पोलिसांनी म्हमद्याला अटक करण्यासाठी चार पथके नियुक्त केली होती. या चारही पथकांमार्फत त्याच्या माहितीची शहानिशा होत आहे. त्याच्या जबानीतून अद्याप कोणाचेही नाव समोर आलेले नाही. आपण विविध ठिकाणी दर्ग्यात राहत होतो, असे तो सांगत आहे. त्याला मदत करणाऱ्या हितचिंतकांची नावे त्याने लपवून ठेवली आहेत. खंडणीचा गुन्हाही तो कबूल करीत नाही. मनोज माने हा आपल्याला संपविणार असल्यानेच त्याला संपविल्याचे तो सांगतो. आपण कोठेही अडचणीत येऊ नये, अशीच उत्तरे तो तपास पथकाला देत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, म्हमद्याला बेडकीहाळ येथे पोलिसांनी अटक केली. त्याठिकाणी तो काय करत होता, याची माहिती घेतली जात आहे. इचलकरंजीतील एका मित्राच्या साहाय्याने त्याने बेडकीहाळ येथे खोली भाड्याने घेतली होती. खोली मालकाला त्याने आपण ठेकेदार असल्याचे सांगितले होते. तेथे त्याने मेसही लावली होती. म्हमद्या कुख्यात गुंड असल्याचे समजल्यावर खोली मालक व मेस चालकाची बोबडी वळली. म्हमद्याकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)
इचलकरंजीत सहकारी : शोध सुरू
माने याच्या खुनानंतर म्हमद्या सांगलीतून फरार झाला होता. या काळात तो इचलकरंजीतील एका मित्राच्या संपर्कात आला. या मित्रानेच त्याला बेडकीहाळ (कर्नाटक) येथे भाड्याने खोली घेण्यास मदत केली होती. तसेच त्याच्या जेवणाची व्यवस्थाही त्यानेच करून दिली. हा मित्र कोण आहे, याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे.
म्हमद्याचा साथीदार कमर मुजावर याला माने खूनप्रकरणी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. दोन वर्षापूर्वी शंभरफुटी रस्त्यावर झालेल्या इम्रान मुल्ला खून प्रकरणातील फिर्यादीवर दगडफेक व धमकीच्या प्रकरणातही कमर सहभागी होता. वृत्तपत्रांतील छायाचित्रावरून मुल्लाच्या नातेवाईकांनी त्याला ओळखले. त्यामुळे कमर मुजावर याला पुन्हा अटक केली जाणार आहे. त्यासाठी विश्रामबाग पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे.