पाटबंधारेच्या विश्रामगृहासह कॉलनीत ठेकेदाराची बडदास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:32+5:302021-05-29T04:21:32+5:30
कडेगाव : चिंचणी (ता. कडेगाव) येथे पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात बड्या परप्रांतीय ठेकेदाराची वर्षानुवर्षे बडदास्त सुरू आहे. येथील कॉलनीही या ...
कडेगाव : चिंचणी (ता. कडेगाव) येथे पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात बड्या परप्रांतीय ठेकेदाराची वर्षानुवर्षे बडदास्त सुरू आहे. येथील कॉलनीही या ठेकेदाराकडील कामगारांच्या ताब्यात आहे.
माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांनी पाठपुरावा करून पंचवीस वर्षांपूर्वी चिंचणी येथे पाटबंधारे विभागाचे आलिशान विश्रामगृह व वीस कर्मचाऱ्यांना राहण्याची सुविधा व प्रशस्त मैदान असलेली कॉलनी उभारली आहे. तेथे बड्या परप्रांतीय ठेकेदाराची वर्षानुवर्षे बडदास्त सुरू आहे.
सध्या गृह विलगीकरणातील बहुतांशी रुग्ण नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने गावोगावी संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चिंचणी ग्रामपंचायतीने येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. मात्र वाढती रुग्णसंख्या आणि तिसऱ्या लाटेला तोड देण्याची पूर्वतयारी म्हणून अन्य एका ठिकाणी विलगीकरण केंद्रासाठी जागा बघून ठेवावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. काही ग्रामस्थांनी कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांना पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह व कॉलनीमध्ये ठेकेदाराचा ताबा असल्याचे सांगितले. यावर तहसीलदार पाटील यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली असता तेथे संबंधित ठेकेदाराच्या चारचाकी गाड्या, डंपर आदी अनेक वाहने कॉलनीतील विस्तीर्ण जागेत उभी होती. ठेकेदाराने विश्रामगृहाला व कॉलनीतील खोल्यांना कुलूप लावलेले होते. हा ठेकेदार व कामगार गावी गेले आहेत असे समजले. यावर पाटील यांनी ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांना विश्रामगृह रिकामे करावे व कॉलनी उपलब्ध करून द्यावी असे पत्र दिले आहे.
चौकट
भाडेपट्ट्याचे काय?
चिंचणी येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात रहात असलेल्या ठेकेदार व कॉलनीत राहत असलेल्या कामगारांच्या खोल्यांचा भाडेपट्टा करार झाला आहे का? किती खोल्यांचे आणि किती भाडे जमा झाले आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतु नाममात्र भाड्यात या ठेकेदाराला वर्षानुवर्षे आलिशान सुविधा दिल्या जात असल्याची चर्चा आहे.
फोटो : चिंचणी तालुका कडेगाव येथील पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह