आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांसाठी सरपंचानी सहभाग द्यावा : डॉ. अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 02:06 PM2020-02-11T14:06:32+5:302020-02-11T14:12:17+5:30

आपत्तीला तोंड देण्यासाठी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पूरप्रवण गावातील सर्व सरपंच यांनी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी अभ्यासपूर्ण सहभाग द्यावा.

To contribute to disaster management plans: Abhijit Choudhary | आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांसाठी सरपंचानी सहभाग द्यावा : डॉ. अभिजीत चौधरी

आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांसाठी सरपंचानी सहभाग द्यावा : डॉ. अभिजीत चौधरी

Next
ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन आराखड्यांसाठी सरपंचानी सहभाग द्यावा : डॉ. अभिजीत चौधरीसरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम

सांगली : आपत्तीला तोंड देण्यासाठी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पूरप्रवण गावातील सर्व सरपंच यांनी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी अभ्यासपूर्ण सहभाग द्यावा. आपत्तीमुळे नुकसान कमी होईल यादृष्टीने अभ्यास करून आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, यशदा पुणे व एन.आय.डी.एम. नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील पूरप्रवण गावातील गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याच्या अनुषंगाने सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदा, पुणे चे संचालक कर्नल व्ही. एन. सुपनेकर (निवृत्त), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह वाळवा, पलूस शिराळा व मिरज तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच पूरप्रवण गावातील सरपंच उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून त्या आराखड्यामध्ये समाविष्ट कराव्यात. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य सुस्थितीत ठेवावे व त्याची देखभाल व दुरूस्ती निरंतर ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापूरात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन तसेच फक्त महापूराबाबत मर्यादित न राहता इतर सर्व आपत्तींच्या अनुषंगाने परिपूर्ण असे गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सर्व समावेशक गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी संबंधितांनी सर्व यंत्रणांशी समन्वय साधावा असे आवाहन करून मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत म्हणाले, सरपंच यांना गावस्तरावरील स्थानिक प्रश्नांची जाण असते. त्यांना असणाऱ्या माहितीचा उपयोगही आराखडे तयार करताना करावा.

कर्नल व्ही. एन. सुपनेकर (निवृत्त) म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व घटकांचा समावेश आवश्यक आहे. गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करताना आपली काय क्षमता आहे व आपणास कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.

आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळात व आपत्तीनंतर करण्याची कार्यवाही या सर्व बाबींवर सखोल अभ्यास करून सर्व यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. सर्व साहित्य, संसाधने सुस्थितीत आहेत की नाही याची निरंतर रंगीत तालीम घेणे आवश्यक आहे.

आपत्तीबाबतची माहिती गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे असे नियोजन करावे. यामध्ये प्रसार माध्यमांची महत्वाची भूमिका असून जनतेला वेळेवर माहिती, सल्ला देण्यासाठी, लोकांच्या गरजा निदर्शनास आणण्यासाठी प्रसार माध्यमांचा योग्य वापर करावा.
आपत्तीची क्षमता कमी करून शकतो पण आपत्ती ही येणारच यासाठी प्रतिसाद यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे.

आपल्याजवळ जे उपलब्ध आहे त्याचा वापर कसा करावा याबाबत गाव पातळीवर प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शोध व बचाव, हानीचा अंदाज, मदत वाटप, निवाऱ्याचे व्यवस्थापन, आरोग्य नियोजन, पाण्याचे शुध्दीकरण, गोदामांची देखभाल, पशुधनास मदत, मानसिक ताणतणाव व्यवस्थापन, रसद पुरवठा व्यवस्थापन, पाणी व वीजपुरवठा, तात्पुरत्या जीवनावश्यक गरजांची पूर्ती, सुरक्षा, स्वच्छता, दळणवळण, आपदग्रस्तांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत सखोल मार्गदर्शन करून आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा व तो कसा तयार करावा याबाबत सविस्तर माहिती दिली व दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे पुनरावलोकन करावे, असे आवाहनही कर्नल व्ही. एन. सुपनेकर (निवृत्त) यांनी यावेळी केले.

यावेळी विविध गावचे सरपंच यांनी त्यांचे महापूरातील अनुभव कथन करून त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी त्यांच्या समस्यांचे निराकरण संबंधितांनी केले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली. दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पूरप्रवण 104 गावांतील सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सांगून आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सर्व पूरबाधित गावातील सरपंच यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दिनांक 11 व 12 फेब्रुवारी रोजी मिरज तालुक्यातील 12, पलूस 14, वाळवा 18 व शिराळा तालुक्यातील 8 अशा एकूण 52 पूरप्रवण गावातील तलाठी व ग्रामसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण, दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी मिरज तालुक्यातील 8, पलूस 11, वाळवा 20 व शिराळा तालुक्यातील 13 अशा एकूण 52 पूरप्रवण गावातील तलाठी व ग्रामसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे नदाफ यांनी सांगितले.

 

Web Title: To contribute to disaster management plans: Abhijit Choudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.