मानवतेचा मळा फुलविण्यात साहित्याचे योगदान : महावीर जोंधळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:07 AM2019-01-04T00:07:37+5:302019-01-04T00:10:16+5:30
समाजातील एकरूपता नष्ट होत प्रत्येक समाज स्वाभिमानी होत आहे. प्रत्येकाला राष्टशी देणे-घेणे नसून केवळ समाजाशी बांधिलकी जपण्याची नवी घातक परंपरा निर्माण होत आहे.
सांगली : समाजातील एकरूपता नष्ट होत प्रत्येक समाज स्वाभिमानी होत आहे. प्रत्येकाला राष्टशी देणे-घेणे नसून केवळ समाजाशी बांधिलकी जपण्याची नवी घातक परंपरा निर्माण होत आहे.
त्यामुळेच समाजात समतावादाचे संस्कार पेरण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करणे आवश्यक असून, घातक रूढींना मूठमाती देत मानवतेचा मळा फुलविण्यात साहित्याचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी गुरूवारी कर्नाळ (ता. मिरज) येथे केले.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व दक्षिण महाराष्ट साहित्य सभा कोल्हापूर यांच्यावतीने कर्नाळ येथे आयोजित पाचव्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी संमेलनाची अध्यक्षा तेजश्री पाटील, स्वागताध्यक्ष मयूर पाटील या विद्यार्थ्यांसह जिल्हाभरातील साहित्यप्रेमी शिक्षक उपस्थित होते.
जोंधळे म्हणाले, देशाची संस्कृती आणि परंपरा सर्वसमावेशक असताना, आजची घातक परंपरा त्यास मोडीत काढत आहे. विचार मारून टाकत, नव्या विचारांचे आक्रमण केले जात आहे. अशा काळात मानवतावादी व समतावादी दृष्टिकोनाची समाजाला गरज आहे. वाचनातूनच हा दृष्टिकोन निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांनी वाचनास प्राधान्य द्यावे. समाजात बदल घडविण्याची ताकद साहित्य, नाट्य चळवळीत असते. लेखकाचे आडनाव वाचून कविता, कथा वाचू नका, तर जे जे सकस मिळेल, ते साहित्य वाचण्यास विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे.
सांगली जिल्ह्याला साहित्याची मोठी परंपरा असून साहित्यिकांच्या गावांची तीर्थस्थळेच झाली पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षकांनी साहित्यिकांच्या गावांना भेट देऊन इतिहास जाणून घेतला पाहिजे. विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नव्या पिढीचे दर्शन घडत असून साहित्य चळवळ वृध्दिंगत होण्यासाठी याची आवश्यकता आहे.
यावेळी डायटचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, संमेलनाचे निमंत्रक मुश्ताक पटेल, शिक्षण अधिकारी नामदेव माळी, रघुनाथराव पाटील, दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, बजरंग संकपाळ, नीलम माणगावे, मच्छिंद्र ऐनापुरे यांच्यासह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, साहित्यप्रेमी उपस्थित होते.
मोबाईल नको पुस्तक द्या
जोंधळे म्हणाले, आजचे पालक विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन देतात. या मुलांना मोबाईलची काहीही गरज नसून त्यांना पुस्तकांची जास्त गरज आहे. घरामध्ये पुस्तक वाचनासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होणार आहे. पुस्तकाशिवाय माणूस घडत नाही, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यास शिक्षकांनी प्राधान्य द्यावे.
सातव्या वेतन आयोगाचा सदुपयोग करा
जोंधळे म्हणाले, शिक्षकांना आता सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. याचा उपयोग आपल्या मुलांच्या जडणघडणीसाठी करा. त्यांना घरात एक स्वतंत्र वाचनालय तयार करून पुस्तके आणून द्या, संगणक उपलब्ध करून द्या. आव्हाने स्वीकारण्यासाठी आवश्यक विविध विषयांवरील पुस्तक वाचनात आपल्या पाल्यांना त्यांना रमू द्या. अशाप्रकारे वाढलेल्या पगाराचा सदुपयोग करा.