सांगली जिल्ह्यातील पूरिस्थिती नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:32 PM2020-08-20T17:32:26+5:302020-08-20T17:34:03+5:30
धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा व वारणा नदीची पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. नदी पातळीत घट होत असून नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
सांगली : धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा व वारणा नदीची पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. नदी पातळीत घट होत असून नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता नोंदल्या गेलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासात सांगलीत ६, शिराळा तालुक्यात ८, तर कडेगावला १ मि.मी. पावसाची नोंद झाली. अन्यत्र पावसाने उघडीप दिली आहे.
कोयना धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळी ४१, तर वारणा धरण क्षेत्रात ३५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही कमी होत आहे. कोयनेतून सध्या २ हजार १00, तर वारणा धरणातून २ हजार ९00 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत घट होत आहे. सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मंदगतीने घट होत आहे. सध्या याठिकाणी ३६.६ फूट पाणी पातळी आहे. शहरातील नदीकाठच्या वस्त्यांमधील पाणीही ओसरत आहे. बायपास रस्त्यावरील ओतांमध्ये पाणी अद्याप साचले आहे.