बाजार समितीच्या गोदामावर मिरज पंचायत समितीचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2016 10:12 PM2016-07-04T22:12:49+5:302016-07-05T00:27:38+5:30

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची जागरुकता : अखेर मालमत्तेचा शोध लागला

The control of Miraj Panchayat Samiti on the market committee's warehouse | बाजार समितीच्या गोदामावर मिरज पंचायत समितीचा ताबा

बाजार समितीच्या गोदामावर मिरज पंचायत समितीचा ताबा

Next

मिरज : मालमत्तेविषयी अनभिज्ञ असलेल्या मिरज पंचायत समितीला माजी सभापती व अधिकाऱ्यांच्या जागरुकतेने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाच गुंठे गोदामाचा ताबा मिळाला आहे. या गोदामाचा गेली ३५ वर्षे इतर विभाग वापर करीत असल्याचेही उघडकीस आले आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी जिल्हा परिषद व मिरज पंचायत समितीला सांगली बाजार समितीच्या आवारात प्रत्येकी पाच गुंठ्याचे भूखंड दिले आहेत. यावर गोदामेही उभारण्यात आली आहेत. मात्र मालकी हक्काच्या या मालमत्तेविषयी पंचायत समिती प्रशासन अनभिज्ञ आहे. बाजार समितीवर आलेल्या प्रशासकाकडून विचारणा झाल्यानंतर, सांगलीच्या बाजार समितीच्या आवारात पंचायत समितीच्या मालकीचे गोदाम असल्याची बाब उघडकीस आली. कृषी अधिकारी अण्णासाहेब बारावकर यांनी तत्कालीन सभापती दिलीप बुरसे यांना याविषयी माहिती दिल्याने, बुरसे यांनी भेट देऊन गोदामामधील साहित्य हलविण्यास भाग पाडून ताबा घेतला. मिरज पंचायत समितीकडे वाटपासाठी येणाऱ्या कृषी, महिला-बालकल्याण, पशुसंवर्धन या विभागाचे साहित्य ठेवण्याची सोय नाही. शेती अवजारे जागेअभावी पंचायत समितीच्या आवारात उघड्यावरच उतरवून घ्यावी लागत होती. माजी सभापती बुरसे व कृषी अधिकारी बारावकर यांच्या जागरुकतेने गोदाम ताब्यात मिळाल्याने साहित्य ठेवण्याचा पश्न सुटणार आहे. (वार्ताहर)


बांधकाम विभाग : भोंगळ कारभार
मिरज पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार नेहमीच चर्चेचा विषय आहे. पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे मालमत्तेच्या देखभालीची व दुरुस्तीची जबाबदारी आहे. सांगली बाजार समिती आवारातील गोदामाकडे या विभागाचे दुर्लक्ष असल्यानेच पंचायत समिती प्रशासन मालमत्तेविषयी अनभिज्ञ असल्याचे उघडकीस आले आहे.

बाजार समितीच्या बेदाणा सौद्याच्या ठिकाणापासून नजीकच असलेल्या गोदामावर अनेक व्यापाऱ्यांचा डोळा आहे. ताबा घेतलेल्या गोदामाचा वापर न झाल्यास ते पंचायत समितीच्या ताब्यातून काढून घेण्याच्या बाजार समितीच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे प्रशासनाने दुरूस्ती करून गोदामाचा वापर सुरू केला, तरच हे गोदाम ताब्यात राहणार आहे.

Web Title: The control of Miraj Panchayat Samiti on the market committee's warehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.