तासगावची वादग्रस्त महिला कर्मचारी सक्तीच्या रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:02 PM2020-01-16T13:02:26+5:302020-01-16T13:03:23+5:30
तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील त्या वादग्रस्त महिला कर्मचाऱ्याविरोधात बचत गटातील महिलांच्या लेखी तक्रारी होत्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा अहवाल आल्यामुळे, तिला मंगळवार, दि. १४ पासून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
सांगली : तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील त्या वादग्रस्त महिला कर्मचाऱ्याविरोधात बचत गटातील महिलांच्या लेखी तक्रारी होत्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा अहवाल आल्यामुळे, तिला मंगळवार, दि. १४ पासून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
तिच्या सर्व गैरकारभाराच्या चौकशीचा अहवाल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (बेलापूर) यांच्याकडे पाठविला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहे. या कक्षातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांने, समूह संसाधन व्यक्ती म्हणून ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या काही महिलांकडे, त्यांना मिळालेल्या मानधनातून प्रत्येकी दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याची चर्चा होती.
काही बचत गटांच्या नावावर कर्ज काढून उसने पैसे घेतले होते. तसेच हिरकणी पुरस्कार देण्यासाठीदेखील या महिलेने वीस हजार रुपयांची मागणी केल्याची चर्चा आहे. हा विषय लोकमतने चव्हाट्यावर आणला होता.
या प्रश्नावर सोमवारी तासगाव पंचायत समितीमध्येही मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पंचायत समितीच्या सभापती कमल पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे अहवाल पाठवून, वादग्रस्त महिला कर्मचाऱ्यांची येथून बदली करा आणि त्याच्या कारभाराची सखोल चौकशी करा, अशी मागणी केली होती.
त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या वादग्रस्त महिला कर्मचाऱ्यास तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. तिच्याविरोधात जेवढ्या तक्रारी आल्या होत्या, त्यांचा सविस्तर अहवाल बेलापूर येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाकडे मंगळवारी पाठविला आहे. या अहवालामध्ये त्यांनी, संबंधित महिला कर्मचाऱ्याचा गैरकारभार लक्षात घेता, तिची सेवा खंडित करण्याची शिफारस केली आहे.